अन्यथा आंदोलनाचा इशारा
। अलिबाग । प्रतिनिधी ।
कुरुळ येथील आरसीएफ कर्मचारी वसाहतीमधून सर्वसामान्यांचा येण्या-जाण्याचा मार्ग अचानक बंद करण्यात आला. यामुळे प्रकल्पगस्त, विद्यार्थी, स्थानिक महिला, पुरुष यांना प्रचंड त्रास होत आहे. अनेकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. बंद केलेला मार्ग पूर्ववत सुरु करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी केली आहे. यावर तात्काळ कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन पुकारले जाईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी शेकाप सरचिटणीस माजी आ. जयंत पाटील यांनीदेखील आरसीएफ प्रशासनाला याबाबत पत्र दिले आहे.
अलिबाग तालुक्यातील थळ येथे खतनिर्मिती करणारा आरसीएफचा प्रकल्प 42 वर्षांपूर्वी आला. कंपनीने कर्मचार्यांच्या निवार्यासाठी कुरुळ येथे शेकडो एकर जागेत आरसीएफ कर्मचारी वसाहत उभारली. या वसाहतीमध्ये सुरुवातीला कंपनीतील कर्मचारी, अधिकारी यांना राहण्याची व्यवस्था होती. मात्र, काही अधिकारी व कर्मचार्यांनी अन्य ठिकाणी जागा घेऊन घरे बांधली. त्यामुळे कंपनीतील कर्मचार्यांचा या जागेत येण्याचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे कंपनीने वेगवेगळ्या शासकीय विभागात असलेल्या कर्मचार्यांसाठी राहण्याची मुभा दिली. या वसाहतीमध्ये खेळण्याबरोबरच फेरफटका मारण्यासाठी नागरिक ये-जा करतात, विद्यार्थीदेखील या ठिकाणी येतात. कुरुळ, वेश्वी, चेंढरे व अन्य गावात ये-जा करण्यासाठी वसाहतीमधील मार्ग सोयीस्कर आहे. त्यामुळे नागरिकांच्या वेळेची व पैशाची बचत होते. परंतु, काही दिवसांपासून कर्मचारी वसाहतीमध्ये बाहेरील व्यक्तींना, विशेष म्हणजे स्थानिकांना प्रवेश बंद केला आहे. त्यामुळे सर्वांना अलिबागमधून ये-जा करावी लागत आहे. महागाईच्या काळात हातावर पोट असणार्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. स्थानिकांसह नागरिकांचा विचार करून बंद केलेला मार्ग पूर्ववत सुरू करण्यात यावा, अशी मागणी चित्रलेखा पाटील यांनी केली आहे. याबाबत त्यांनी आरसीएफ प्रशासनाला पत्र दिले आहे.
थळ येथील आरसीएफ कंपनीसह कुरुळ येथील कर्मचारी वसाहतीसाठी स्थानिकांनी जमीन दिल्या. त्यामुळे प्रकल्प व वसाहत उभी राहिली. काही दिवसांपूर्वी वसाहतीमधून ये-जा करण्यासाठी कंपनी प्रशासनाने बंदी घातली आहे. या बंदीमुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत, काही वेळा प्रवेशद्वारासमोरील सुरक्षा रक्षकांसोबत वादही होत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कंपनी प्रशासनाने स्थानिकांचा विचार करून त्यांच्यासाठी वसाहतीमधून ये-जा करण्यासाठी मार्ग खुला करावा, असे आरसीएफ प्रशासनाला पत्र देऊन विनंती केलेली आहे अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा चित्रलेखा पाटील यांनी दिला आहे.