कार्यकर्त्यांसह मतदारांची अलोट गर्दी
। अलिबाग । प्रतिनिधी ।
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अलिबाग-मुरूड आणि रोहा विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांचा बेलोशी परिसरात प्रचार करण्यात आला. चिऊताई यांचे बेलोशीसह अनेक गावांमध्ये आगमन होताच त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी व घोषणाबाजी करीत कार्यकर्ते व मतदारांनी अलोट गर्दी केली. कार्यकर्त्यांच्या गर्दीने संपूर्ण परिसर गजबजून गेला होतो.
अलिबाग तालुक्यातील बेलोशी, घोटवडे, खानाव, बामणगाव आदी गावांमध्ये रविवारी (दि.10) सायंकाळी चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांच्या प्रचाराला सुरुवात झाली. बेलोशीतून प्रचाराला सुरुवात करण्यात आली. प्रचारादरम्यान चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांचे गावांमध्ये आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यांनी गावांतील मंदिरात जाऊन दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी असंख्य कार्यकर्ते प्रचारात सहभागी झाले होते.
प्रचारादरम्यान, चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांनी शेकापचे ज्येष्ठ कार्यकर्ते अनंत पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कार्यकर्ते व महिलांशी संवाद साधून शिट्टी चिन्हा समोरील बटण दाबून निवडून देण्याचे आवाहन केले. अलिबाग तालुक्यातील रामराज येथेदेखील चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांचा प्रचार दौरा आयोजित करण्यात आला होता. रामराज स्थानकाजवळ त्यांचे आगमन होताच, त्याठिकाणीदेखील फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. बेलोशीतील सतिश वारगे यांच्या निवासस्थानी सभा घेण्यात आली. यावेळी चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यानंतर घोटवडे, खानाव, बामणगाव आदी गावांमध्ये जाऊन चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी महिला, तरुण मंडळी ज्येष्ठ कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. एक वेगळा उत्साह या निमित्ताने दिसून आला. चित्रलेखा पाटील यांना प्रचाराच्या दरम्यान मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी शेकापचे तालुका चिटणीस अनिल पाटील यांच्यासह बेलोशी, घोटवडे, खानाव, बामणगावमधील कार्यकर्ते, महिला तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.