‌‘महाराष्ट्र केसरी’साठी प्रसाद सस्ते याची निवड!

| पिंपरी | वृत्तसंस्था |

चिंचवड कुस्तीगीर संघाच्या वतीने, वाकड येथे आयोजित ‌‘महाराष्ट्र केसरी’ निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत मोशीचा पै. प्रसाद सस्ते आणि भोसरीचा पै. समाधान दगडे यांची निवड झाली आहे. राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने, फुलगाव येथे 66 वे राज्य अधिवेशन आणि राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामध्ये, ‌‘महाराष्ट्र केसरी’ किताबासाठी लढती होणार आहेत. या स्पर्धेसाठी पिंपरी-चिंचवड शहर कुस्तीगीर संघाने, वाकड येथील कावेरी नगर क्रीडा संकुल येथे निवड चाचणी स्पर्धा भरविण्यात आली.

स्पर्धेचे उद्घाटन पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संघाचे सचिव संतोष माचुत्रे, माजी नगरसेवक विनायक गायकवाड, दिलीप बालवडकर, ‌‘भारत केसरी’ पै.विजय गावडे, अनुप मोरे, तेजस्विनी कदम, काळुराम कवितके, अरुण तांबे, पंडित मोकाशी, बबन बोऱ्हाडे, राजू कुदळे, रतन लांडगे आदी उपस्थित होते. पंच म्हणून विजय कुटे, रोहिदास आमले, विक्रम पवळे, बाळासाहेब काळजे यांनी काम पाहिले. या स्पर्धेमध्ये एकूण 110 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. पै.विजय गावडे यांनी स्वागत केले. पै.संतोष माचुत्रे यांनी सूत्रसंचालन केले. तर आभार पै. ज्ञानेश्वर कुटे यांनी आभार मानले.

स्पर्धेच्या गादी विभागात (86 ते 125 किलो महाराष्ट्र केसरी गट) मोशीचा पै.प्रसाद सस्ते आणि आकुर्डीचा पै.संकेत घाडगे यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली. यामध्ये,पै.सस्ते याने विजय मिळवून महाराष्ट्र केसरी कुस्ती किताब लढतीसाठी प्रवेश निश्चित केला. माती विभागातून भोसरीचा पै.समाधान दगडे आणि आकुर्डीचा पै. तन्मय काळभोर यांच्यामध्ये लढत झाली. त्यामध्ये, पै.दगडे याने विजय मिळवून ‌‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती किताबी लढतीसाठी प्रवेश मिळविला.

Exit mobile version