गीतेंना भरघोस मतांनी निवडून द्या- आ. जयंत पाटील

। अलिबाग । प्रतिनिधी ।

बदलत्या राजकारणामुळे देश हुकूमशाहीच्या वाटेवर आहे. ही हुकूमशाही नष्ट करण्यासाठी, संविधान वाचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी या निवडणूकीत प्रचंड मेहनत घेतली पाहिजे. रायगड लोकसभेची निवडणूक ही आपल्या सर्वांसाठी अस्तित्वाची असणार आहे. निष्ठावंत अनंत गीते यांच्या रुपाने महाविकास आघाडीचे उमेदवार लाभले आहेत. त्यांना निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून द्या, असे आवाहन शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी केले. रोहा तालुक्यातील चणेरा येथील कुणबी समाज हॉल येथील प्रांगणात इंडिया आघाडीच्या पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांची सभा रविवारी (दि.28) घेण्यात आली. यावेळी आ. जयंत पाटील बोलत होते. सध्याचे राजकारण हे गलिच्छ आहे. सर्वसामान्यांना वेठीस धरणाचे काम केले जात आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या महागाईमुळे सर्वसामान्य त्रस्त झाले आहे. सरकार विरोधात बोलणार्‍यांवर वेगवेगळ्या सुरक्षा यंत्रणेतून दबाव आणला जातो.

ही मोठी शोकांतिका असल्याचे आ. जयंत पाटील म्हणाले, मागील निवडणूकीत ज्यांना आपण निवडून दिले. तेच आपल्याला विसरून गेले आहे. आपल्याशी गद्दारी करण्याचे काम केले आहे. या निवडणूकीत गद्दारांना जागा दाखविण्याची वेळ आली आहे. फसवेगिरी करणार्‍यांना चिरडण्याची ही वेळ आहे. त्यानुसार प्रत्येकाने काम करून अनंत गीते यांना या निवडणूकीत निवडून देण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घ्या, असे आवाहन आ. जयंत पाटील यांनी केले आहे. यावेळी माजी आ. पंडित पाटील, महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते, शिवसेना उध्दव ठाकरे गट जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, समीर शेडगे, विष्णू पाटील, शेख सुभानअली आदी मान्यवरांसह शेकाप व इंडिया आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विकास कामांकडे तटकरेंचे दुर्लक्ष
रायगड जिल्ह्यातील अलिबाग - रोहा, मुंबई गोवा हायवे असे अनेक प्रश्‍न तटकरे सोडवतील म्हणून त्यांना मागच्यावेळेला निवडून दिले. मात्र, निवडून आल्यावर त्यांनी त्याकडे लक्षच दिले नाही. फक्त सरकारकडे पाठपूरावा सुरु असल्याच्या बतावण्या करण्याचे काम केले. विकासाच्या बाता मारणार्‍या सुनील तटकरे यांनी पाच वर्षात काय केले असा संतप्त सवाल माजी आ. पंडित पाटील यांनी उपस्थित करीत त्यांचा पाढाच वाचून दाखविला.
Exit mobile version