रिया टायगरचा पराभव, हॅट्ट्रिकची संधी हुकली; अद्विक-रुत्वी वॉरिअर्सचा ‘सुपर’ विजय
| चौल | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील चौलमळा गावात ग्रामदेवता आई कृष्णादेवीच्या आशीर्वादाने आणि “एक दिवस एकजुटीसाठी, एक दिवस गावासाठी” या प्रेरणादायी संकल्पनेतून क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सलग दोन वर्षे विजेतेपद पटकावणारे संघमालक सचिन आमरे आणि कर्णधार प्रशांत आमरे यांच्या नेतृत्वाखालील रिया टायगर संघ यंदा विजयाची हॅट्ट्रिक साधण्याच्या इराद्याने मैदानात उतरला होता. मात्र, संघमालक मंदार नाईक आणि कर्णधार मनीष नाईक यांच्या अद्विक-रुत्वी वॉरिअर्सने जिद्द, संयम आणि धैर्याच्या जोरावर सुपर ओव्हरमध्ये थरारक विजय मिळवत रिया टायगरची विजयी मालिका खंडित केली आणि विजेतेपद खेचून आणले.
चौलमळा क्रिकेट संघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेली चौलमळा प्रिमिअर लीग-पर्व तिसरे ही क्रिकेट स्पर्धा रविवारी (दि.1) उत्साह, जल्लोष आणि एकोप्याच्या वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली. या स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष होते. गावकऱ्यांचा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ही स्पर्धा गावचे प्रमुख रवींद्र घरत, उपप्रमुख जितेंद्र पाटील, युवक मंडळ अध्यक्ष महेंद्र नाईक आणि उपाध्यक्ष अल्पेश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी चौलमळा क्रिकेट संघाच्या सर्व सभासदांनी अहोरात्र मेहनत घेत नियोजन, व्यवस्था आणि समन्वयाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. त्यांच्या परिश्रमामुळेच हा क्रीडा सोहळा दिमाखात साकार झाला.
अंतिम सामना रिया टायगर आणि अद्विक-रुत्वी वॉरिअर्स यांच्यात अत्यंत चुरशीचा व प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोका चुकवणारा ठरला. सामन्याच्या सुरुवातीलाच रिया टायगरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यांच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून अचूक टप्प्यावर मारा करत अद्विक-रुत्वी वॉरिअर्सच्या फलंदाजांना पूर्णतः जखडून ठेवले.
तीन षटकांच्या सामन्यात अद्विक-रुत्वी वॉरिअर्स संघाला अवघ्या 26 धावांवर रोखण्यात रिया टायगरला यश आले. 27 धावांचे माफक लक्ष्य पाहता रिया टायगर सहज विजय मिळवेल आणि हॅट्ट्रिक साजरी करेल, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, अद्विक-रुत्वी वॉरिअर्सच्या गोलंदाजांनी जबरदस्त पुनरागमन करत सामन्यात रंगत आणली. अचूक आणि नियंत्रित गोलंदाजी करत रिया टायगरच्या फलंदाजांवर दबाव निर्माण केला. निर्धारित षटकांत रिया टायगरलाही 26 धावांवर रोखण्यात आले आणि सामना बरोबरीत सुटत सुपर ओव्हरमध्ये पोहोचला.

रिया टायगर उपविजेते
चौलमळा प्रिमिअर लीगमध्ये यंदा रिया टायगर संघाने पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. संघमालक सचिन आमरे आणि कर्णधार प्रशांत आमरे यांच्या नेतृत्वाखाली या संघाने २०२४ आणि २०२५ या सलग दोन वर्षांत विजेतेपद पटकावत स्पर्धेत आपला दबदबा निर्माण केला होता. यंदाही रिया टायगरने साखळी सामन्यांमध्ये अपराजित राहून अंतिम फेरीत धडक मारली होती. उत्कृष्ट गोलंदाजी, आक्रमक फलंदाजी आणि अचूक क्षेत्ररक्षणाच्या जोरावर त्यांनी पुन्हा एकदा विजेतेपदाच्या दिशेने वाटचाल केली होती. मात्र अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात अद्विक-रुत्वी वॉरिअर्सविरुद्ध झालेल्या सुपर ओव्हरच्या थरारात रिया टायगरला निसटता पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे विजयाची हॅट्ट्रिक साधण्याचे त्यांचे स्वप्न थोडक्यात अपूर्ण राहिले. तरीही संपूर्ण स्पर्धेत दाखवलेली त्यांची सातत्यपूर्ण कामगिरी प्रेक्षकांच्या कौतुकाचा विषय ठरली.

अनिकेत म्हात्रे विजयाचा शिल्पकार
अद्विक-रुत्वी वॉरिअर्सच्या विजेतेपदात अष्टपैलू खेळाडू अनिकेत म्हात्रे याची कामगिरी निर्णायक ठरली. साखळी सामन्यांपासून अंतिम सामन्यापर्यंत सलामीला येत त्याने केलेली जोरदार फटकेबाजी आणि वेगवान ओपनिंग गोलंदाज म्हणून बजावलेली भूमिका उल्लेखनीय ठरली. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांत सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरी करत त्याने संघाला अनेक महत्त्वाच्या क्षणी बळ दिले. विशेषतः अंतिम सामन्यातील सुपर ओव्हरमध्ये त्याने दाखवलेले धैर्य आणि आत्मविश्वास सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ठरले. सुपर ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर संघाच्या विजयासाठी तीन धावांची गरज असताना अनिकेतने खणखणीत षटकार ठोकत अद्विक-रुत्वी वॉरिअर्सला थरारक विजय मिळवून दिला. त्यामुळे तो संघाच्या विजयाचा खरा शिल्पकार ठरला. अष्टपैलू आणि निर्णायक कामगिरीबद्दल अनिकेत म्हात्रेला अंतिम सामन्यात ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
‘साई’ची लीला
चौलमळा गावातील डावखुरा अष्टपैलू खेळाडू साईप्रसाद पडवळ आणि साईप्रसाद लोके यांनी यंदाच्या चौलमळा प्रिमिअर लीगमध्ये आपल्या दमदार खेळाने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रेक्षकांची भरभरून दाद मिळवली. मागील दोन वर्षांप्रमाणे यंदाही या दोघांनी धडाकेबाज फलंदाजी आणि प्रभावी गोलंदाजी करत मैदानावर आपल्या खेळाची ‘साई’ लीला दाखवून दिली. त्यांच्या आक्रमक खेळीमुळे अनेक सामन्यांमध्ये संघाला महत्त्वाच्या धावा मिळाल्या. उत्कृष्ट फलंदाजीबद्दल साईप्रसाद पडवळ आणि साईप्रसाद लोके या दोघांनाही ‘बेस्ट फलंदाज’ म्हणून गौरविण्यात आले. तर संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणाऱ्या राकेश लोहार याला ‘बेस्ट बॉलर’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेच्या यशात मोलाचा वाटा
चौलमळा प्रिमिअर लीग स्पर्धेत मैदानावरील खेळाइतकेच समालोचन आणि स्कोअरिंगची जबाबदारीही तितक्याच कुशलतेने पार पाडण्यात आली. स्पर्धेतील प्रत्येक सामन्याची अपडेट आपल्या ओघवत्या आणि प्रभावी आवाजातून शशिकांत म्हात्रे, सुशांत शिवलकर आणि महेश घरत यांनी देत उत्कृष्ट समालोचन केले. त्यांच्या उत्साही आणि माहितीपूर्ण समालोचनामुळे प्रेक्षकांचा उत्साह अधिकच वाढला. तसेच प्रत्येक सामन्याचा अचूक स्कोअर आणि अपडेट्स ठेवण्याचे महत्त्वाचे काम योगेश जाधव, विजय सातांबेकर, आशिष म्हात्रे आणि राजेंद्र घरत यांनी जबाबदारीने पार पाडले. त्यांच्या चोख आणि शिस्तबद्ध कामगिरीमुळे संपूर्ण स्पर्धेचे नियोजन सुरळीत आणि प्रभावीपणे पार पडले.
सुपर ओव्हरचा थरार
सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना रिया टायगरने एका षटकात 14 धावांचे लक्ष्य उभे केले. अद्विक-रुत्वी वॉरिअर्ससमोर आता 15 धावांचे आव्हान होते. रिया टायगरकडून सुपर ओव्हर प्रशांत आमरे यांनी टाकली. अद्विक-रुत्वी वॉरिअर्सकडून अनिकेत म्हात्रे आणि जितेंद्र जाधव ही सलामीची जोडी मैदानात उतरली. पहिल्या पाच चेंडूंमध्ये या जोडीने धडाकेबाज फलंदाजी करत 12 धावा फटकावल्या. शेवटच्या चेंडूवर विजयासाठी तीन धावांची आवश्यकता असताना पुन्हा सामना टाय होऊन आणखी एक सुपर ओव्हर होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र दबावाच्या क्षणी अष्टपैलू अनिकेत म्हात्रेने प्रशांत आमरे यांच्या अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार ठोकला आणि अद्विक-रुत्वी वॉरिअर्सला संस्मरणीय विजय मिळवून दिला. क्षणातच मैदानात एकच जल्लोष उसळला. सहकाऱ्यांनी अनिकेतला खांद्यावर उचलून आनंद साजरा केला. अष्टपैलू कामगिरीबद्दल अनिकेत म्हात्रेला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
जल्लोषात ट्रॉफी उंचावली
अखेर अद्विक-रुत्वी वॉरिअर्स संघ विजेता ठरल्याने संघमालक मंदार नाईक आणि कर्णधार मनीष नाईक यांच्या हस्ते ट्रॉफी उंचावण्यात आली. टाळ्यांचा कडकडाट, जल्लोष आणि आनंदाच्या घोषणांनी संपूर्ण मैदान दणाणून गेले. रिया टायगरनेही कडवी झुंज देत अंतिम सामन्याला खरी रंगत आणली.
ही लीग केवळ क्रिकेटची स्पर्धा नसून गावाच्या एकजुटीचा, आपुलकीचा आणि सकारात्मक ऊर्जेचा उत्सव ठरली. मैदानावर स्पर्धा झाली, पण मनात मात्र सर्वांनी एकोप्याची भावना जपली. जिंकणारा संघ एकच असला तरी आनंद साजरा करणारे संपूर्ण गाव होते, हेच या स्पर्धेचे खरे यश आहे.
रवींद्र घरत,
गावप्रमुख, चौलमळा







