तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली कारवाई; स्थानिकांचा विरोध झुगारून अतिक्रमणे हटविली
| खोपोली | प्रतिनिधी |
पर्यटकांच्या गर्दीने दर वीकेंडला वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या चौक फाट्याने सोमवारी अखेर मोकळा श्वास घेतला. चौक-कर्जत राज्यमार्ग क्रमांक 79 व जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या चौक फाटा परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा असलेली अतिक्रमणे प्रशासनाने हटविली. तहसीलदार अभय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईला काही स्थानिकांनी जोरदार विरोध केला; मात्र, चार जेसीबींसमोर हा विरोध निष्प्रभ ठरला.
चौक फाटा हा कर्जत आणि माथेरानकडे जाणाऱ्या पर्यटकांसाठी प्रमुख मार्ग आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवसांत मुंबई, पुणे परिसरातून मोठ्या संख्येने पर्यटक या मार्गावरून कर्जत-माथेरानकडे रवाना होतात. त्यामुळे चौक फाटा परिसरात वाहनांची मोठी गर्दी होऊन वारंवार वाहतूक कोंडी होते. कोंडी सोडविताना पोलिसांचीही चांगलीच दमछाक होते. दरम्यान, खालापूर-जांबरुंग-पळसदरीमार्गे कर्जतकडे जाणारा पर्यायी रस्ता उपलब्ध असला तरी त्याचे काम अनेक ठिकाणी रखडले आहे. त्यामुळे पर्यटक चौक फाटा मार्गालाच पसंती देतात. वाढत्या पर्यटक संख्येचा फायदा घेत रस्त्याच्या दुतर्फा अनेक छोटे-मोठे व्यावसायिक, दुकानदारांनी व्यवसाय थाटले होते. या दुकानांमध्ये येणारी वाहने रस्त्यावर उभी राहात असल्याने वाहतुकीला आणखी अडथळा निर्माण होत होता. यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंवरील अतिक्रमणे वाहतूक कोंडीसाठी मोठा अडसर ठरत होती. अखेर सोमवारी प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम राबविली.
या कारवाईत नायब तहसीलदार सुधाकर राठोड, पोलीस निरीक्षक प्रदीप रायन्नावर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता संदेश पाटील, अभियंता सतीश गायकवाड, खालापूर मंडळ अधिकारी संदेश पानसरे, माणिक सानप, चौक तलाठी अक्षय गावडे, वासंबे मंडळ अधिकारी श्रीनिवास खेडकर, वावोशी मंडळ अधिकारी सचिन वाघ, खोपोली मंडळ अधिकारी भरत सावंत, तलाठी अभिजीत हिवरकर यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
अतिक्रमणे हटविली
रस्त्याच्या दोन्ही बाजूंवरील अतिक्रमणे वाहतूक कोंडीसाठी मोठा अडसर ठरत होती. अखेर सोमवारी प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. कारवाईदरम्यान काही स्थानिकांनी प्रशासनाला विरोध केला. मात्र, प्रशासनाने कारवाई सुरूच ठेवत रस्त्यालगतची अतिक्रमणे हटविली.
