| रसायनी | वार्ताहर |
चौक बाजारपेठ, सभोवतालच्या वाड्या-वस्त्या व आजूबाजूच्या गावांसाठी खालापूर तालुक्यातील एकमेव असलेले ग्रामीण रुग्णालय चौक हे त्यांच्यासाठी वरदान ठरत आहे. ग्रामीण रुग्णालय चौक येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ. सविता काळेल यांनी पदभार स्विकारल्यापासून चौक ग्रामीण रुग्णालयाचा कायापालट झाल्याचे दिसून येत आहे. मोहोपाडा रसायनीसह तालुक्यातील अनेक रुग्णांना विविध प्रकारच्या सेवांचा लाभ मिळाला आहे.
रुग्णालयात डॉक्टर्स, नर्स, दंत चिकित्सक आणि इतर कर्मचारी यांच्या उपलब्धतेमुळे रुग्ण संख्यांची उपचारासाठी प्रचंड वाढ दिसून येत आहे. आंतररुग्णांसाठी रुग्णालयात सकस आहार, चहा नाश्ता, पुरिफाईड पाणी, आंघोळीसाठी गरम पाणी, मनोरंजनासाठी प्रत्येक वार्डात टि. व्ही.संच व प्रत्येकाला आयुर्वेदाची माहिती व्हावी यासाठी हर्बल गार्डनही तयार करण्यात आले आहे. बाह्यरुग्ण विभागात दिवसाला किमान 200 रुग्ण सेवेचा लाभ घेतात. तसेच, ज्या रुग्णांना रुग्णालयात भरतीची आवश्यकता असते अशांना रुग्णालयात भरती करून पुढील उपचार दिले जातात. त्यांचीही संख्या महिन्याला सरासरी 500 असते.





