। रेवदंडा । प्रतिनिधी ।
रेवदंड्यातील आगरकोट किल्ला, कोर्लई किल्ला व कोर्लई गावात आजही अनेक वास्तू ,ऐतिहासिक चर्च प्राचीन, पोर्तुगिज काळाची साक्ष देत आहेत. रेवदंड्यातील माय दे देऊस हे चर्चसुद्धा या काळाचे साक्षीदार असून दि. 5 मे रोजी रेवदंड्यातील या मंदिरात ख्रिस्ती बांधव श्रद्धा व भक्तीने विविध उत्सव साजरे करतात. रेवदंडा गोळा स्टॉप नजीकच असलेले माय दे देऊस चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवासह सर्व धर्मियाचे श्रध्दास्थान आहे. चर्चला पत्राचे छप्पर असून कार्यक्रमासाठी उजव्या बाजूला मोकळी जागा असून तेथेच छोटेखानी व्यासपिठ आहे. समोरील बाजूस विहीर असून ही नवसाला पावणारी तसेच चमत्कार घडविणारी माऊली आहे असे सांगितले जाते. देवीच्या वास्तव्याने परिसरात रोगराई कधीच येत नाही अशी भक्तांची श्रद्धा आहे. वसई, मुंबई, पुणे, गोवा आदी ठिकाणाहून भक्त मंडळी, विशेषतः ख्रिस्ती बांधव देवीचा दर्शनासाठी माय दे देऊस चर्चमध्ये येतात.
या चर्चमध्ये उत्सवापूर्वी 9 दिवस अगोदर ख्रिस्ती बांधव सायकांळी प्रार्थना करतात. या नऊ दिवसात कोर्लई येथील ख्रिस्ती बांधव हे नऊ दिवस कोर्लई ते रेवदंडा असा पायीच चालत येत असतात. दि.5 मे रोजी कोर्लई सह संपुर्ण महाराष्ट्रात तसेच देश विदेशात विखुरलेले ख्रिस्ती बांधव माय दे देऊस उत्सवास येत असतात. या उत्सवाचे निमित्ताने सकाळी ख्रिस्ती बांधव रेवदंडा गावातून पालखी सोहळा आयोजित करतात. या पालखी सोहळयास उपस्थित ख्रिस्ती बांधवाचा सहभाग असतो. या देवीच्या पालखीस हिंदु धर्मिय श्रीफळ अर्पण करून देवीचे दर्शन घेतात. कोर्लई गावात 31 मे रोजी फिरवून रोगराई येऊ नये तसेच पीक उत्तम येऊन सुखशांती लाभावी यासाठी कोलर्र्ई गावात या देवीची पालखी फिरविण्यात येते.