| पनवेल | प्रतिनिधी |
सिडकोच्या उलवे नोडमधील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधातील कारवाईनंतर आता अनधिकृत आठवडा बाजारांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. सिडकोने उलवे पोलिसांच्या सहकार्याने सेक्टर 19 मधील अनधिकृत आठवडा बाजारावर धडक कारवाई केली. या संयुक्त कारवाईदरम्यान रस्ते आणि पदपथांवर अनधिकृतपणे व्यवसाय करणारे विक्रेते व हातगाड्या हटविण्यात आल्या. तसेच, वाहतुकीस अडथळा ठरणारे साहित्यही हटविण्यात आले. त्यामुळे परिसरातील रस्ते व पदपथ नागरिकांसाठी मोकळे झाले. सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या आदेशानुसार, मुख्य नियंत्रक विशाल ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रक अमित राजपूत यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. सिडकोचे अधिकारी-कर्मचारी, सुरक्षा रक्षक, उलवे पोलिस, कामगार आणि टेम्पो पथकाने संयुक्तपणे कारवाई यशस्वी केली. दरम्यान, उलवे नोडमधील रस्ते व पदपथ अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी यापुढेही विविध ठिकाणी अशा प्रकारच्या कारवाया सुरू राहणार असल्याचे सिडको प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांनी नियमांचे पालन करावे तसेच नागरिक व व्यावसायिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.







