सिडकोने प्रकल्पग्रस्तांच्या ॠणात कायम रहावे

जी.एस.गेल यांचे प्रतिपादन
। पनवेल । वार्ताहर ।
सिडकोच्या माध्यमातून उलवे नोड विभागाचा झालेला कायापालट पाहताना मला अत्यानंद आहे. पण या प्रक्रियेचा किमयागार जरी सिडको असला तरीही सिडको प्रशासनाने प्रकल्पग्रस्त बांधवांच्या ॠणात कायम राहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सिडकोचे माजी व्यवस्थापकीय संचालक जी.एस.गेल यांनी केले आहे.
दुधे बिल्डर्स निर्मित सी रिजेंसी प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. तुकाराम दुधे संचलित दुबे बिल्डर्स यांच्या वतीने उलवे नोड सेक्टर 3 येथे अद्ययावत अशा गृहनिर्माण प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्रीसाई संस्थान शिर्डीचे माजी अध्यक्ष सुरेश हावरे, काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष तथा इंटक चे राष्ट्रीय सचिव, कामगार नेते महेंद्र घरत, नवी मुंबई पोलिस परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक शंकर म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी, आज ज्या पद्धतीने प्रकल्पग्रस्त बांधवांनी एकजुटीने हे हक्क मिळविले, त्याच पद्धतीने पुन्हा एकदा एकजूट करून उर्वरित पावणे चार टक्के हक्क मिळवावे लागतील, असे परखड मत सुरेश हावरे यांनी व्यक्त केले.

Exit mobile version