| पनवेल | प्रतिनिधी |
सिडकोच्या नवी मुंबई अनधिकृत बांधकाम विभागातर्फे गेल्या काही महिन्यांपासून अनधिकृत बांधकामांसह अतिक्रमणांवरील कारवाईची मोहिम तीव्र करण्यात आली. नुकतीच या पथकाने कामोठे नोडमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली आहे. या कारवाईत अनधिकृत झोपड्यांसह पत्रा व बांबूशेडयुक्त ढाबे हटविण्यात आले आहेत.
सिडकोच्या अनधिकृत बांधकामे विभागामार्फत करण्यात आलेल्या या कारवाईत, कामोठे नोड प्रभाग क्रमांक 25 येथे सामाजिक सुविधांकरिता राखीव असणाऱ्या भूखंड क्र. 12, 13 येथे निष्कासन मोहिम राबबिली. सिडकोच्या जागेवरील अंदाजे क्षेत्रफळ 1600 चौ.मी.वरील अनधिकृत बांधकामाचा 1 बांबूशेडचा ढाबा व भूखंड क्र. 14, 15 येथील अंदाजे क्षेत्रफळ 1700 चौ.मी. जागेवरील अनधिकृत बांधकामाचे कच्च्या बांबूशेडचे 15 स्टॉल्स जेसीबीच्या साहाय्याने निष्कासित केले. तसेच, भूखंड क्र. 31 येथील अंदाजे क्षेत्रफळ 6283 चौ.मी. येथे निष्कासन मोहिम राबवून सिडकोच्या स्टार हॉटेल वापराकरिता राखीव असलेल्या भूखंडावरील बांधलेले अनधिकृत शेड व पत्राशेडच्या 25 झोपड्या जेसीबीच्या साहाय्याने हटविण्यात आल्या. सिडकोतर्फे कारवाई केलेल्या नमूद अतिक्रमणे ही सिडकोच्या प्रचलित नियमावली व धोरणांचा भंग करून व सिडको महामंडळाकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी न घेता उभारण्यात आल्यामुळे निष्कासित करण्यात आल्याची माहिती सिडकोने दिली. सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या निर्देशानुसार व मुख्य नियंत्रक, अनधिकृत बांधकामे (नवी मुंबई) यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको अतिक्रमण विभागाचे अधिकारी, स्थानिक पोलीस अधिकारी व सिडको पोलीस पथक, महावितरण विभागाचे अधिकारी, सिडको सुरक्षा रक्षक आणि महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षक यांच्या सहभागाने यशस्वीपणे ही कारवाईची मोहिम राबविण्यात आली. या कारवाईसाठी 4 लेबर, 1 जेसीबी, 2 जीप असा लवाजमा तैनात ठेवण्यात आला होता.






