बेकायदेशीर टपर्‍यांवर सिडकोची कारवाई

| उरण | प्रतिनिधी |
जेएनपीटी टाऊनशिपसमोर सिडकोच्या जागेवर उभारण्यात आलेल्या बेकायदेशीर टपर्‍यांवर शुक्रवारी सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाने धडक कारवाई करून त्या जमीनदोस्त केल्या. उरण तालुक्यातील सिडकोच्या बहुतेक मोकळ्या जागांवर अतिक्रमणे झाली असून, ती हटवणे सिडकोला मोठी डोकेदुखी झाली आहे. सिडकोच्या जागांवर अतिक्रमणं करून टपर्‍या उभ्या करायच्या व त्या परप्रांतियांना भाड्याने देऊन हजारो रुपये कमविण्याचा मोठा गोरखधंदा काही स्थानिक लोकांनी सुरू केला आहे. अशा टपर्‍या जेएनपीटी टाऊनशिपसमोर मोठ्या प्रमाणात उभ्या राहिल्या होत्या.

त्याबाबतच्या तक्रारी सिडकोच्या अतिक्रमण विभागाला प्राप्त होताच सिडकोच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख अधिकारी लक्ष्मीकांत डावरे यांनी मोठा फौजफाटा घेऊन त्या टपर्‍यांवर धडक कारवाई करून त्या जमीनदोस्त केल्या. काही स्थानिकांनी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडे टपर्‍या कायदेशीर असल्याचे पुरावे नसल्याने त्यांचा विरोध कुचकामी ठरला. या कारवाईमुळे बेकायदेशीर टपर्‍या उभ्या करून त्या भाड्याने देणार्‍या गावगुंडांना चांगली चपराक बसली आहे.मात्र हटवलेल्या टपर्‍या पुन्हा उभ्या राहणार नाहीत याची काळजी सिडको घेईल का, असा सवाल उपस्थित होत आहे.

Exit mobile version