| पनवेल | प्रतिनिधी |
खारघर-कोपरा येथे बार आणि रेस्टोरंट करिता करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर सिडकोने मंगळवारी (दि.28) कारवाई केलेली आहे. शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल तालुका उपाध्यक्ष अजित अडसूळे यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत करण्यात आलेल्या या कारवाई बाबत परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
खारघर-कोपरा परिसरातील सेक्टर-10 परिसरात भंगार गोदाम, हॉटेल, बार, रेस्टॉरंट धारकांनी कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम केले होते. या अनधिकृत बांधकामास सिडको विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम अन्वये नोटीस बजावण्यात आलेली होती. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटवणे आवश्यक होते. परंतु, त्यांनी या ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरूच ठेवल्याने सिडको अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार अनधिकृत बांधकाम पोकलेनच्या साहाय्याने पुर्णत: पाडण्यात आले.