जलकुंभाबाबत सिडकोची चालढकल

शेतकरी कामगार पक्षाची सिडकोकडे मागणी
| पनवेल | प्रतिनिधी |
कामोठे शहरात सध्या एकूण 43 सेक्टरपैकी 27 सेक्टरमध्ये नागरिक राहात आहेत. त्यात साधारणतः अडीच ते तीन लाख लोकसंख्या असून, संपूर्ण शहरात फक्त सेक्टर 8 येथे एकच जलकुंभ आहे. साठवणुकीची क्षमता नसल्याने जेव्हा नवी मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी देईल, तेव्हाच व्यवस्थित दाबाने पाणी पुरवठा होतो. अन्यथा सर्वत्र पाण्यासाठी त्रागा आहे. सेक्टर 21 मध्ये सिडकोने जलकुंभासाठी जागा राखीव ठेवली आहे. तिथे जलकुंभ बांधण्यासाठी दोन वर्षांपूर्वी निविदासुद्धा काढल्या, मात्र आजतागायत बांधकामाला सुरुवात झाली नाही.

सेक्टर 21 मध्ये जलकुंभ झाल्यास त्याचा फायदा सेक्टर 15,16,17,18,19,20,21 तसेच 22 ला मोठ्या प्रमाणात होईल. मात्र, सिडकोकडून चालढकल होताना दिसून येत आहे. सिडकोने इमारती बांधताना परवानगी दिली, पण पाण्यासाठी दुर्लक्ष केले आहे. पुरेसा दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याने रहिवासी टँकरचे पाणी विकत घेत आहेत. त्यासाठी त्यांच्यावर आर्थिक भूर्दंड पडत आहे. अनेक नागरिक टँकर आणि सिडकोचे अधिकारी यांचे साटेलोटे आहे का याविषयी शंका उपस्थित करत आहेत.

नागरिकांना होणारा त्रास आणि सिडकोची मनमानी याविषयी शेतकरी कामगार पक्षाने सिडकोला निवेदन दिले आहे. मागील काही वर्ष एकता सामाजिक संस्था आणि शेतकरी कामगार पक्ष यासंदर्भात सिडकोबरोबर पत्रव्यवहार करीत आहे. जेव्हा जलकुंभ बांधण्याची निविदा निघाली, तेव्हा काही अंशी बरे वाटले. मात्र, पुन्हा सिडकोचे येरे माझ्या मागल्या सुरु आहे, अशी भावना शेकाप शहर अध्यक्ष अमोल शितोळे यांनी व्यक्त केली.

सेक्टर 15,16,17,18,19,20,21,22 ला हक्काचे पाणी मिळाले पाहिजे याविषयी शेकाप कामोठे विभाग पूर्ण ताकतीने प्रयत्न करेल. सिडकोला आंदोलनाचीच भाषा कळत असेल तर तेही करू.

– गौरव पोरवाल, कार्याध्यक्ष, शेकाप, कामोठे विभाग
Exit mobile version