| पनवेल | प्रतिनिधी |
तळोजा नोडमधील अनधिकृत व्यावसायिक अतिक्रमणांविरोधात सिडकोने धडक कारवाई केली आहे. सेक्टर 1, 4, 34 आणि 36 मध्ये राबविण्यात आलेल्या या मोहिमेत हॉटेल्स, वॉशिंग सेंटर्स, चिकन व भाजीविक्रीची दुकाने, रसवंतीगृहे, कंटेनरमधील कार्यालये आणि अन्य व्यावसायिक अतिक्रमणे हटविण्यात आली. या कारवाईत सुमारे 8,700 चौरस मीटर क्षेत्र अतिक्रमणमुक्त करण्यात आले असून, सुमारे 25 स्टॉल्स निष्कासित करण्यात आले.
तळोजा नोडमधील सिडकोच्या मालकीच्या भूखंडांवर अनेक व्यावसायिकांनी अनधिकृतपणे बांधकामे करून व्यवसाय सुरू केले होते. या अतिक्रमणांविरोधात सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने विशेष मोहीम राबविली. सेक्टर 1 मध्ये सुमारे 200 चौरस मीटर जागेवर सुरू असलेले अनधिकृत हॉटेल आणि वॉशिंग सेंटर हटविण्यात आले. तसेच सेक्टर 4 मधील भूखंड क्रमांक 21 येथे सुमारे 1,500 चौरस मीटर जागेवरील चिकन व भाजीविक्रीची दुकाने, रसवंतीगृह, कंटेनरमधील कार्यालय आणि अन्य अतिक्रमणे हटविण्यात आली. दरम्यान, सेक्टर 34 आणि 36 मधील दीपसागर व सुखसागर गृहसंकुलांसमोरील सुमारे 7,000 चौरस मीटर जागेवरही मोठ्या प्रमाणात व्यावसायिक अतिक्रमणे करण्यात आली होती. या ठिकाणची अनधिकृत दुकाने, वॉशिंग सेंटर्स, हॉटेल्स, भाजीविक्री केंद्रे आणि अन्य व्यावसायिक आस्थापने हटवून परिसर मोकळा करण्यात आला. सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे आणि मुख्य नियंत्रक (अनधिकृत बांधकामे) विशाल ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली, नियंत्रक (अनधिकृत बांधकामे) पावसकर यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. भूमापक वैभव काळे यांच्यासह सिडकोचे पोलीस पथक, स्थानिक पोलीस, सुरक्षा रक्षक आणि संबंधित कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते. तळोजा परिसरातील सिडकोच्या भूखंडांवरील अनधिकृत व्यावसायिक अतिक्रमणांविरोधातील या कारवाईमुळे संबंधित व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
तळोज्यात अनधिकृत बांधकामांवर सिडकोचा हातोडा
