। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जेएसडब्ल्यू डोल्वी वर्क्सच्या कारखान्यात सुरक्षेचा स्तर वाढविण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) उच्च कौशल्ययुक्त आणि हत्यारधारी कमांडोंची नेमणूक करण्यात आली आहे. जेएसडब्ल्यू वर्क्स हा सीआयएसएफच्या सुरक्षा आदेशांतर्गत आलेला जेएसडब्ल्यू ग्रुपचा पहिला आणि कॉर्पोरेट भारतातील 13 वा औद्योगिक कारखाना आहे. सीआयएसएफ टीमच्या नव्या जबाबदारीचा परिचय करून देण्याच्या प्रसंगी कारखाना प्रमुख आशीष चंद्रा, सुरक्षा व जनसंपर्क प्रमुख कॅ. राजेशकुमार रॉय आणि जेएसडब्ल्यूमधील दक्षता विभागाचे प्रमुख डीआयजी (निवृत्त) सुरेश कुमार उपस्थित होते. सीआयएसएफच्या पश्चिम विभागाचे आयजी के. एन. त्रिपाठी या अभिमुखता प्रसंगासाठी उपस्थित होते.
जेएस डोल्वी वर्क्समध्ये जेएसडब्ल्यू ग्रुपच्या स्टील व सिमेंट उद्योगाचा एक सर्वात मोठा कारखाना आहे. त्याला जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून धरमतर बंदर संचलनाचे सहाय्य लाभले आहे. हा एक स्टील निर्मिती कारखाना होता. हा कारखाना इस्पात इंडस्ट्रीजकडून 2010 मध्ये जेएसडब्ल्यूने संपादित केला. गेल्या 10 वर्षांत, सिमेंट व बंदर कामकाज स्थापन करण्यासोबतच जेएसडब्ल्यू ग्रुपने या कारखान्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे.
जेएसडब्ल्यू स्टीलचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर गजराज सिंग राठोड यांच्या मते, “जेएसडब्ल्यू डोल्वी वर्क्सचे मोक्याचे ठिकाण लक्षात घेता महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील हा एक महत्त्वाचा लँडमार्क आहे. गेल्या दशकभरात, स्टील, सिमेंट व पायाभूत सुविधा उद्योगामध्ये आपल्या कामकाजाचे विस्तारीकरण करण्यासाठी जेएसडब्ल्यू ग्रुपने मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. आमच्या कारखान्याचे महत्त्व लक्षात घेता विविध सुरक्षा जोखीमांपासून वाढीव संरक्षण गरजेचे होते. म्हणूनच जेएसडब्ल्यू डोल्वीमधील सुरक्षेचे व्यवस्थापन करण्यासाठी अत्याधुनिक कौशल्य असलेल्या प्रोफेशनल संस्थेची नियुक्ती करण्याची विनंती आम्ही केंद्र सरकारला केली होती.
सीआयएसएफतर्फे भारतातील 350 अस्थापनांना संरक्षण देण्यात येते. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातर्फे अवकाश अस्थापना, बंदरे, विमानतळे, अणुऊर्जा विभा, दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन, राजधानीतील शासकीय इमारती, व्हीआयपी सुरक्षा आणि इतर देशांतर्गत सुरक्षा पुरविण्यात येते.