। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
गंमत शाळा आणि अभिवाचन संध्या यांच्या संयुक्य विद्यमाने आणि यतीन घरत आणि श्रध्दा पोखरणकर यांच्या पुढाकाराने अलिबागेत ‘बाल साहित्य अभिवाचन’ हा तीन दिवसांचा उपक्रम, 3,4, व 5 जून संध्याकाळी 7 ते 8 त वेळेत, चेंढरे ग्रामपंचायतीच्या सभागृहात संपन्न झाला. मराठी बाल साहित्यातील काही निवडक आणि अभ्यासपूर्ण लेखकांच्या गोष्टींचे वाचन या प्रसंगी करण्यात आले. यावेळी, अभिवाचनात अलिबागेतील वसुंधरा पोखरणकर, विपीन राऊत आणि श्रेया अधिकारी यांनी वाचक म्हणून भाग घेतला. तसेच कार्यक्रमाचे कार्यकारिणी म्हणून प्रतीक पानकर आणि तन्वी पाटील यांनी यांची भूमिका चोख वठवली. विशेष म्हणजे या उपक्रमाचा मुलांसोबतच त्यांच्या पालकांनीही आणि इतर अलिबाग कारांनीही आस्वाद घेतला.
मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच त्यांच्या कानावर छोट्या छोट्या गोष्टीतून गोष्ट मांडणे त्यातले सार समजून घेणे हा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश होता, जो पालकांच्या प्रतिक्रियांमधून सिद्ध झाला असे लक्षात येते. मुलं गोष्ट फक्त ऐकत नाहीत तर घरी गेल्यावर त्यावर बोलतात, विज्ञान कथे मधील प्रयोग घरी करून बघण्यास उत्साह दाखवतात ही या कार्यक्रम यशस्वी होण्याची पावती आहे असे गंमत शाळा आणि अभिवाचन संध्या मानतात.
हा कार्यक्रम तीन दिवस सुरू होता पण त्यामागील मेहनत बऱ्याच दिवसांची होती. आणि यामध्ये सहकार्य लाभले ते यतीन घरत, आनंद कोळगावकर, तसेच मुंबई चे सचिन शिंदे यांचे. सचिन शिंदे यांनी मीडिया पार्टनर म्हणून स्वेच्छेने काम केले. यासाठी गंमत शाळा आणि अभिवाचन संध्या यांनी सगळ्यांसाठी आभार व्यक्त केले. अलिबाग मध्ये छोट्या दोस्तांसाठी असे अधिकाधिक कार्यक्रम व्हावेत अशी गंम्मत शाळेची मनीषा आहे. यासाठी अलिबाग मधील जाणकार मंडळी पुढे येतील ही आशा गंमत शाळा आणि अभिवाचन संध्या यांनी व्यक्त केली आहे.