| पनवेल | प्रतिनिधी |
नवीन पनवेल येथील सेक्टर 14 मधील आमराई उद्यानात महापालिकेच्या ठेकेदाराकडून सुरू असलेल्या कामादरम्यान खोदण्यात आलेला खड्डा गेल्या पंधरा दिवसांपासून उघडाच ठेवण्यात आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या खड्ड्याभोवती कोणत्याही प्रकारचे बॅरिकेड्स, सूचना फलक किंवा सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सायंकाळच्या वेळेत या उद्यानात मोठ्या प्रमाणात लहान मुले खेळण्यासाठी तसेच नागरिक फिरण्यासाठी येत असतात. त्यामुळे उघड्या खड्ड्यामुळे गंभीर अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अंधाराच्या वेळी एखादे मूल किंवा ज्येष्ठ नागरिक या खड्ड्यात पडण्याची शक्यता असल्याने पालक वर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे. परिसरातील रहिवाशांनी याबाबत अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा केला आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आमराईतील खड्ड्यामुळे नागरिकांचा संताप
