। पनवेल । प्रतिनिधी ।
मेट्रोमोनी साईटवरून लग्न करण्यास पसंती दर्शवून वेगवेगळी कारणे देत महिलेकडून 21 लाख 14 हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
20 सप्टेंबर 2025 ते 30 जानेवारी 2026 दरम्यान तक्रारदार महिलेने मेट्रोमोनी साईटवर दिलेल्या प्रोफाईलवरील मोबाईल क्रमांकावर समीर पोड राहणार युनायटेड किंगडम नावाच्या व्यक्तीची संपर्क साधला, त्याने डॉक्टर असल्याचे सांगून त्यांच्यासोबत लग्न करण्यास पसंती दर्शविली. त्यानंतर त्यांचे व्हॉट्सॲपवर बोलणे आणि चॅटिंग सुरू झाले. आरोपी मुंबईला भेटण्यासाठी येत असताना त्याला दिल्ली विमानतळावर इमिग्रेशन विभागातील अधिकारी यांनी जास्त प्रमाणात पैसे घेऊन आल्याच्या कारणावरून पकडले असून, त्याला सोडविण्यासाठी इंटरनॅशनल टॅक्स सर्टिफिकेट तसेच अँटी मनी लॉड्रिग सर्टिफिकेटसाठी पैसे पाठविण्यास सांगितले, यावेळी व्हॉट्सॲपवर दिलेल्या वेगवेगळ्या खात्यांवर तक्रारदार महिलेने 21 लाख 14 हजार रुपये पाठविले. मात्र, त्यानंतर संबंधित व्यक्तीची संपर्क होऊ शकला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.






