महानगरपालिकेकडून पाणी फवारणी मोहीम
| पनवेल | प्रतिनिधी |
ऑक्टोबर महिन्याच्या तीव्र उकाड्याने पनवेलकर हैराण झाले आहेत. दिवसेंदिवस वाढत चाललेले तापमान आणि शहरातील सुरू असलेली बांधकामे यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धुरळा पसरत आहे. या धुरक्यामुळे नागरिकांना सर्दी, खोकला, श्वसनाचा त्रास अशा आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिकेने पुढाकार घेत शहरातील प्रमुख रस्ते, चौक, तसेच बांधकाम क्षेत्राजवळील झाडांवर पाण्याची फवारणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे हवेतला धुरळा कमी होऊन नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.
पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून रोज सकाळी आणि संध्याकाळी ही पाणीफवारणी मोहीम राबवली जाणार आहे. नागरिकांनीही बांधकाम स्थळांवर माती झाकून ठेवावी आणि धुरळा नियंत्रणात ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पनवेल शहरात सुरू असलेल्या या मोहिमेमुळे वातावरणात थोडासा गारवा आणि श्वास घ्यायला दिलासा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
