| पनवेल | प्रतिनिधी |
गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पनवेल महापालिका क्षेत्रातील अनेक रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. सर्वत्र खड्डे पडल्याने नागरिकांना प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. येऊ घातलेल्या सणांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे आता रस्ते दुरुस्तीच्या कामांना गती देण्यात आली आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांनी नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी बांधकाम विभागाला तातडीने व वेगाने कामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ऑगस्टमध्ये पावसाचा जोर कमी होईल, अशी अपेक्षा असतानाही दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ता दुरुस्तीची कामे काही दिवस रोखली होती, मात्र आयुक्तांच्या निर्देशानंतर शहरातील प्रमुख रस्त्यांवर खड्डे बुजविणे आणि डांबरीकरणाची कामे युद्धपातळीवर सुरू झाली आहेत.







