| नागोठणे | प्रतिनिधी |
स्वच्छ नागोठणे, सुंदर नागोठणे आणि प्लास्टिक कचरामुक्त नागोठणे या मोहिमे अंतर्गत नागोठणे ग्रामपंचायतीकडून कचऱ्याचे सुयोग्य व्यवस्थापन करण्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू करण्यात आले आहे. जनजागृती करणारी पत्रके वाटून, शहरात दवंडी देऊन, अनेक ठिकाणी स्वच्छता विषयक बॅनर लावून कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याचे काम ग्रामपंचायतीकडून सुरू आहे. असे असतानाच काही नागरिक अद्यापही उघड्यावर कचरा फेकून देत असल्याने स्वच्छतेच्या या मोहिमेत अडथळा येत आहे. त्यामुळेच नागोठणे ग्रामपंचायतीच्या या शून्य कचरा मोहिमेत नागरिकांनीही सहकार्य करावे असे आवाहन नागोठणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रियाताई संजय महाडिक यांनी ग्रामपंचायत कार्यालयातील त्यांच्या दालनात सोमवारी (दि.30) दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमार्फत केले आहे.
ग्रामपंचायत प्रशासन गावात घंटागाडी फिरवून कचऱ्याचे संकलन करीत आहे. त्यासाठी नागरिकांनी ही सुका कचरा, ओला कचरा तसेच प्लास्टिक कचरा वेगळा जमा करून हा कचरा गोळा करण्यासाठी येणाऱ्या घंटागाडीत टाकून गावातील स्वच्छता मोहिमेत सहकार्य करायचे आहे. प्लास्टिक बंदी साठी ग्रामपंचायतीने आजपर्यंत अनेक दुकानांवर दंडात्मक कारवाया करून प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या असल्याने प्लास्टिक पिशवी बंद मोहिमेला 60 ते 70 टक्के यश आले आहे. त्यामुळे भविष्यात गावातून शंभर टक्के प्लास्टिक पिशव्या हद्दपार करण्यासाठी दुकानदारांनी ही सहकार्य करणे गरजेचे आहे.
ग्रामपंचायतीकडून नागोठण्यातील पोस्ट ऑफिस, कन्या शाळा, मस्जिद, लेकव्ह हॉटेल, उरूस सर्कल आदी पाच मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे प्रायोगिक तत्त्वावर बसविण्यात आले आहेत. भविष्यात इतरही काही महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. त्यामुळे उघड्यावर कचरा टाकणारे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होणार असल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलला जात आहे. ग्रामपंचायत कर्मचारी वैभव चितळकर हे उघड्यावर कचरा टाकताना सीसीटीव्हीत दिसणाऱ्या नागरिकांना व महिलांना सक्त ताकीद देत आहेत. मात्र, भविष्यात पुन्हा पुन्हा नागरिकांनी ही चूक केल्यास दंडात्मक कारवाई व फौजदारी पात्र गुन्हा दाखल करण्यात येईल असे स्पष्ट संकेतही ग्राम पंचायत अधिकारी राकेश टेमघरे यांनी दिले आहेत. नागोठण्यातील ही स्वच्छता मोहीम टिकवून ठेवणे ही गावातील प्रत्येक नागरिकांची जबाबदारी असल्याने गावातील सर्व नागरिकांनी, महिलांनी जबाबदारीने वागून ग्रामपंचायतीच्या स्वच्छता मोहिमेत आपले मोलाचे योगदान द्यावे असे आवाहन यावेळी उपसरपंच अखलाक पानसरे यांनी केले. या पत्रकार परिषदेला सरपंच सुप्रिया महाडिक, उपसरपंच अखलाक पानसरे, ग्रामपंचायत अधिकारी राकेश टेमघरे, डॉ. मिलिंद धात्रक, ज्ञानेश्वर साळुंखे, प्रकाश कांबळे, सदस्या पुनम काळे, शबाना मुल्ला, भाविका गिजे, ज्योती राऊत आदी सदस्य यावेळी उपस्थित होते.
स्वच्छता मोहिमेत नागरिकांनी सहकार्य करा: सुप्रिया महाडिक
