591 लाभार्थ्यांनी घेतला विविध योजनांचा लाभ
| नेरळ | प्रतिनिधी |
महसूल विभागाच्या वतीने नेरळ येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरा’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय सेवा आणि दाखले एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरात तब्बल 591 लाभार्थ्यांनी सहभाग नोंदवला. अनेक नागरिकांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले, तर अनेकांच्या प्रलंबित कामांचा जागेवरच निपटारा करण्यात आला.
कर्जत तहसील कार्यालयांतर्गत महसूल मंडळ, नेरळ यांच्या वतीने नेरळ गावातील धारप सभागृहात या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्या सुनिता मोरे आणि कर्जत पंचायत समिती सदस्य भगवान चंचे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला.
यावेळी निवासी नायब तहसीलदार सचिन राऊत यांनी शिबिरामागील उद्देश स्पष्ट करताना ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, यासाठी महसूल विभाग प्रयत्नशील असल्याचे सांगितले. पुरवठा अधिकारी रवींद्र दळवी, भूमी अभिलेख उपअधीक्षक नितीन आटाळे, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश मोरे, अव्वल कारकून कुशाल राठोड, दभडे, गायकवाड यांच्यासह मंडळ अधिकारी विश्वास गडदे उपस्थित होते.
शिबिरामध्ये उत्पन्न, रहिवासी, जातीचे प्रमाणपत्र, नॉन-क्रीमीलेअर दाखले, डिजिटल स्वाक्षरीचे 7/12 व 8-अ उतारे, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक दाखले यांचे जागेवरच वाटप करण्यात आले. तसेच फेरफार प्रकरणे निकाली काढणे, 7/12 मधील त्रुटी दुरुस्त करणे, तुकडेबंदी कायद्याशी संबंधित प्रकरणांचा निपटारा, ई-मोजणी अर्ज, ‘ॲग्रीस्टॅक’ व ‘पीएम किसान’ नोंदणी, सामाजिक अर्थसहाय्य योजना, घरपट्टे वाटप आणि अकृषिक परवानगी प्रकरणांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळ अधिकारी विश्वास गडदे, संतोष जांभळे, किरण बेलोसेकर, विठ्ठल मोरे तसेच ग्राम महसूल अधिकारी संजना पाटील, उमेशकुमार भोरे, मेघा गायकवाड, निखिल लदगे, वैभव तरंगे, संकेत कदम, अनिल फाळके यांच्यासह महसूल कर्मचारी अशोक भगत आणि दीपक पेरणे यांनी परिश्रम घेतले. नागरिकांनी महसूल विभागाच्या या उपक्रमाचे कौतुक केले असून, अशी शिबिरे नियमितपणे आयोजित करण्याची मागणी केली आहे.
शिबिरात विविध विभागांकडे मोठ्या प्रमाणावर नोंदणी झाली. यामध्ये सेतू विभागात 167, आधार कार्ड दुरुस्ती 95, हयात प्रमाणपत्र 85, आरोग्य विभाग 83, ॲग्रीस्टॅक 54, निवडणूक ओळखपत्र 34, शिधापत्रिका 26, भूमी अभिलेख 19, जातीचे दाखले 14, आदिवासी दाखले 7, कृषी विभाग 6 आणि सलोखा योजना 1 अशा एकूण 591 अर्जांची नोंद करण्यात आली.
