एमजेपीच्या वाढीव पाणी बिलांमुळे नागरिक हैराण

। माथेरान । वार्ताहर ।
मागील दोन महिन्याचे भरलेले पाणी बिल पुढील महिन्यात पुन्हा लागून आल्याने नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत. हे बिल कमी करण्यासाठी लोक गेले असता एकही अधिकारी येथे हजर नसल्याने आमची बिल कोण आणि कधी कमी करून मिळणार असा संतप्त सवाल माथेरानकरांनी केला आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संपूर्ण माथेरानला पिण्यासाठी पाणी पुरवते व दर दोन महिन्याला याचे बिल आकारते. येथे 1400 पेक्षा जास्त पाणी ग्राहक असून अतिशय महाग पाणी माथेरानकरांन मिळते. घरगुती, संस्था आणि खाजगी अशा स्वरूपात बिलांची आकारणी होते. प्रति हजार लिटर पाण्यामागे वेगवेगळा बिल आकाराला जातो. कधी शारलोट तलावातून तर कधी नेरळ कुंभे येथून पाणी पुरवठा होतो. या पाण्याचे बिल कार्यालयातून येते आणि या बिलाची रक्कम वसूल करून बँकेत जमा होते. हे अधिकारी ही रक्कम काढतात मात्र लोकांनी भरलेली बिल कमी करत नाहीत.

यामुळे आणि जानेवारी आणि फेब्रुवारीची भरलेली बिले पुन्हा मागील बाकी म्हणून लागून आलेली आहेत. जवळजवळ सर्वच ग्राहकांना वाढीव बिल आलेली आहेत. असे असताना हे बिल कमी करण्यासाठी ग्राहक एमजेपीच्या फिल्टर कार्यालयात गेले असता तिथे पाणी बिल कमी करणारा जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने लोकांचा पारा चढा राहिला. त्यामुळे वाढीव बिले कमी करून कोण देणार आणि कधी देणार? जर बिल उशिरा भरले तर त्याचाही दंड वसुल केला जातो. मग आता एकही अधिकारी येथे उपस्थित नाही तर अधिकाऱ्यांच्या कामचुकार पणाचा भुर्दंड आम्हा लोकांना कशाला? असाही संतप्त सवाल येथील नागरिकांकडून केला जातोय. याबाबत एमजेपीची बाजू ऐकण्यासाठी एमजेपीच्या माथेरान मधील कार्यालयात गेलो असता कुणीही जबाबदार अधिकारी हजर नव्हता.

घरगुती प्रति हजार लिटर दर
0-15 हजार लिटर – 24.20 रुपये
16-25 हजार लिटर – 36.20 रुपये
25 हजार लिटर पेक्षा जास्त-48.70 रुपये

एमजेपी ने पाठवलेली पाणी बिले वाढीव आलेली आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारीची बिले आम्ही एमजेपीला बँक द्वारे अदा केली आहेत. तरी ती बिले पुन्हा लागून आली आहेत. ही बिल कमी करण्यासाठी कार्यालयात गेलो तर कोणीच अधिकारी तिथे उपस्थित नाही. मग ही वाढीव बिले कधी कमी करणार, अधिकाऱ्यांच्या कामचुकार पणाचा त्रास आम्ही का भोगायाचा? माथेरान साठी सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक करायला हवी. नाही तर असाच मनस्ताप आम्हा माथेरानकरांना सहन करावा लागणार का?

– चंद्रकांत धनावडे, स्थानिक

माथेरान मध्ये आम्ही जगातील सगळ्यात महाग पाणी पीत आहोत.एवढा मोठा पाणी दर जगात कुठेही नाही. इतके महाग पाणी बिल भरून सुद्धा नियमित पाणी पुरवठा केला जात नाही. मात्र वाढीव पाणी बिल बरोबर पाठविले जाते. आणि या वाढीव पाणी बिला संदर्भात एमजीपी कार्यालयात गेलो असता तिथे कोणीही अधिकारी जागेवर हजर नाही. आणि याच बरोबर एमजीपी कडून स्थानिकांसाठी कोणतीही योजना आणली जात नाही. मागे देखील अभय योजना आणली परंतु तिचा स्थानिकांना काहीही फायदा झाला नाही. या करिता माथेरान वासीयांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आणि येथे योग्य पद्धतीने कामे होण्यासाठी माथेरान एमजीपी कडून कार्यतत्पर अधिकाऱ्याची नेमणूक येथे करण्यात यावी.

– दिपक जाधव, माजी नगरसेवक

अनियमित पाणी पुरवठा
मे महिन्यापासून माथेरानकरांना अनियमित पाणी पुरवठयाचा सामना करावा लागत आहे.कधी सकाळी तर कधी संध्याकाळी पाणी येते.तर कधी दोन दिवस आड पाणी येते अर्धा इंच पाईप लाईन मधून असे किती पाणी एक तासात येते हा संशोधनाचा विषय आहे.

Exit mobile version