। सुधागड-पाली । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील पाली नगरपंचायत हद्दीत मागील काही दिवसांपासून दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठ्यामुळे नागरिक मोठ्या त्रासाला सामोरे जात आहेत. आरोग्याला हानी पोहोचवणारे हे पाणी प्यावे लागत असल्याने रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी ग्रामस्थांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. या गंभीर समस्येबाबत पाली नगरपंचायतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
पालीतील नागरिकांना सुरक्षित पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे स्थानिक स्तरावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दूषित पाणी पुरवठ्यामुळे विविध प्रकारचे आरोग्याचे आजार उद्भवण्याची शक्यता असल्याने या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे. तसेच, पालीतील फिल्टर योजना हा मुद्दा गेल्या अनेक निवडणुकांमध्ये सर्व पक्षांनी आपल्या प्रचारात प्रभावीपणे मांडला होता. अनेक नेत्यांनी ही योजना पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आजपर्यंत या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे पालीकरांना अद्याप दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी प्यावे लागत असून, राजकीय आश्वासनांचे फोलपणा नागरिकांमध्ये नाराजीचा विषय ठरत आहे.
पाली नगरपंचायतीने या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. सुरक्षित आणि स्वच्छ पाणी पुरवठ्याची व्यवस्था निर्माण करण्यासाठी फिल्टर योजना पूर्ण करण्यासाठी तत्पर पाऊले उचलावीत, अशी जोरदार मागणी पालीकरांकडून केली जात आहे.