। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबई क्रिकेट असोसिएशनचा वार्षिक पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईतील बीकेसी येथील शरद पवार इनडोअर क्रिकेट अकादमी आणि मनोरंजन केंद्रात आयोजित करण्यात आला होता. यावेळी 2022-23 आणि 2023-24 हंगामातील सर्वोत्तम कामगिरी करणार्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला. याशिवाय भारताचे दिग्गज क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर आणि डायना एडुलजी यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. दरम्यान, या पुरस्कार सोहळ्यावेळी अजिंक्य रहाणे, यशस्वी जैस्वाल, सर्फराज खान, सायली सातघरे, सानिका चाळके अशा खेळाडूंचाही विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला. याशिवाय 2023-24 रणजी विजेत्या मुंबई संघाचेही अभिनंदन करण्यात आले. तसेच, 15 युवा खेळाडूंना शदर पवार शिष्यवृत्ती देऊन गौरविण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन महाराष्ट्र सरकारचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक व्यवहार मंत्री आशिष शेलार, एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक आणि एपेक्स कौन्सिलच्या सदस्य उपस्थित होते.