। रोहा । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्याच्या प्रशासनाची सूत्रे रोहा तालुक्यातील राजकारण्यांच्या हाती असल्याचे बोलले जाते. प्रत्यक्षात मात्र रोहा तालुक्यातील नागरिक डिसेंबर महिना संपून देखील प्रधानमंत्री अन्न सुरक्षा योजनेच्या लाभापासून जानेवारी महिन्याचा पहिला आठवडा संपत असताना देखील वंचित असल्याचे तालुका पुरवठा शाखेने दिलेल्या माहितीच्या आधारे दिसून येत आहे. यामुळे जिल्हा प्रशासनावर या राजकारण्यांचा वचक नसल्याचे दिसून येत आहे. कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन केंद्र सरकारने नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यासाठी मोफत अन्नधान्य योजनेला मुदतवाढ दिली होती. रोहा तालुक्यातील नागरिकांसाठी या दोन महिन्यांसाठी एकूण 8125.24 क्विंटल तांदूळ तर 5580.16 क्विंटल गहू नियतन मंजूर करण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र जानेवारी महिना सुरू होऊन देखील 1525 क्विंटल तांदूळ तर 1669 क्विंटल गहू अद्याप तालुक्यातील गोदामात आलेलाच नाही असे पुरवठा विभागातून सांगण्यात आले आहे. ग्रामीण भागातील जनतेला मोफत धान्य आले नाही असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, रेशनिंग दुकानात होत असलेल्या भ्रष्टाचाराबाबत वारंवार तक्रारी करून देखील कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसून येत आहे.







