रसायनांच्या उग्रवासाने झोपमोड

| पनवेल | वार्ताहर |

तळोजा एमआयडीसीमधून रात्री बारानंतर हवेत रसायने सोडली जात आहेत. या रसायनांच्या उग्रवासामुळे तळोजा, नावडे, रोडपाली, खारघर परिसरातील नागरिकांची झोप उडाली असून प्रदूषण महामंडळाच्या दुर्लक्षामुळे कंपन्यांकडून वारंवार असे प्रकार होत असल्याचा आरोप केला जात आहे.

तळोजा औद्योगिक क्षेत्रातून रात्रीच्या वेळी सोडणाऱ्या रसायनांच्या उग्रवासामुळे मळमळ, चक्कर येणे, श्वास घेण्यास अडथळा असे त्रास रहिवाशांना होत आहेत. त्यामुळे रात्री सोडण्यात येणाऱ्या या केमिकलच्या उग्रवासाविरोधात तळोजामधील आदर्श सामाजिक संस्थेने लोकायुक्तांकडे याबाबतची तक्रारही केली होती. दरम्यान, लोकायुक्तांनी प्रदूषण महामंडळ आणि पनवेलच्या तहसीलदारांना पाहणी करून अहवाल सादर करण्याचा सूचना केल्या होत्या. त्यानुसार तहसील कार्यालयाच्या पथकाने केलेल्या पाहणीत तळोजा औद्योगिक परिसर आणि जवळपास गाव आणि वसाहतीत केलेल्या पाहणीत उग्रवास येत असल्याचा अहवाल सादर केला होता. त्यानंतर काही काळ रसायनांचा उग्रवास बंद झाला होता, पण गेल्या महिनाभरापासून रात्री बारानंतर पुन्हा त्रास सुरू झाला आहे.

आधीच वाढत्या तापमानामुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यात रसायनांच्या उग्रवासाने घराच्या खिडक्या बंद ठेवून झोपावे लागत असल्याने प्रदूषण महामंडळाने या कंपन्यांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे. याविषयी प्रदूषण महामंडळाचे तळोजा विभागीय अधिकारी सचिन आडकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Exit mobile version