| तळा | प्रतिनिधी |
तळा शहरातील बँक ऑफ इंडिया शेजारी असलेल्या गटाराची अत्यंत दुरवस्था झाली असून, हे गटार तुंबलेल्या अवस्थेत असल्याने याठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. तालुक्यातील अग्रगण्य असलेल्या तळा बँक ऑफ इंडियाच्या शाखेत तालुक्यातील बहुतांश नागरिकांची खाती असल्याने बँकेच्या कामानिमित्त याठिकाणी नागरिकांची ये-जा सुरू असते. तसेच समोरच घरगुती खाणावळ व शिवभोजन थाळी मिळत असल्याने ग्राहकांची देखील कायम वर्दळ असते. मात्र, याठिकाणी असलेले गटार तुंबल्यामुळे सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून येथील नागरिकांना नाकाला रुमाल बांधून ये-जा करावी लागते. यामुळे डासांची पैदास होऊन डेंग्यू, मलेरिया सारख्या साथीचे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच सदर गटार हे उघड्या अवस्थेत असल्याने रात्रीच्या वेळी पाय अडकून अपघात होण्याची भीती आहे. त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर गटाराची स्वच्छता करून त्यावर झाकण लावावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.







