शेकापच्या वतीने शहराची स्वच्छता

| अलिबाग | प्रतिनिधी |

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शेकाप शहर महिला आघाडीच्या वतीने अलिबाग शहरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान राबविण्यात आले. या अभियानाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील कचरा गोळा करून त्याची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावण्यात आली.

या उपक्रमात शेकाप शहर सोशल मिडीया प्रमुख संजना कीर, शेकाप शहर महिला आघाडी प्रमुख ॲड. निलम हजारे, उपाध्यक्ष अश्वीनी ठोसर, वासंती मुकादम, आदी पदाधिकाऱ्यांसह भाजी व मासळी विक्रेत्या, नगरपरिषदेच्या साफ सफाई करणाऱ्या महिलांनीदेखील सहभाग घेऊन शहरातील मासळी व भाजी बाजारपेठ स्वच्छ केली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून शेकापच्या महिला शहर आघाडीच्या वतीने स्वच्छता मोहिम राबविली जात आहे. ही परंपरा आजही जपण्याचे काम शेकापच्या माध्यमातून करण्यात आले आहे. अलिबाग शहरातील भाजी व मासळी बाजारपेठ परिसर झाडूने साफ करून तेथील कचरा गोळा करून तो कचरा भूमीत टाकण्यात आला. यावेळी ॲड. मानसी म्हात्रे यांनी स्वच्छतेचे महत्व सांगितले.

Exit mobile version