। पोलादपूर । वार्ताहर ।
नगरपंचायत पोलादपूरकडून उत्तरवाहिनी सावित्री नदीपात्रामध्ये शहरातील कचरा गोळा करून टाकण्याचे काम बिनबोभाटपणे सुरू असून अशाप्रकारच्या कृतीमुळे नगरपंचायतीला यापूर्वी हरित लवादाकडून 7 लाख रूपयांचा दंड ठोठावला होता. पोलादपूर नगरपंचायतीने कचरा गोळा करून सावित्री नदीपात्रात टाकण्याकामी तब्बल 79 लाखांची निविदा प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती चर्चेत असून अशाप्रकारे नदीपात्रात कचरा टाकण्याला विरोध असल्याचे पत्र नगरपंचायतीचे विरोधी गटनेता दिलीप भागवत यांनी दिले आहे.
गेल्या काही वर्षांपासून उत्तर वाहिनी सावित्री नदी आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गास समांतर असलेल्या चिखलीचा डोह या चरई फाटयालगतच्या जुना महाबळेश्वर रस्त्याच्या समोरील विस्तारित पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेल परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतीचा आणि त्यानंतर नगरपंचायतीचाही डंम्पींग झोन अस्तित्वात होता. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात हा डम्पिंग झोन जॅकवेलचा परिसर आवश्यक असल्याने भूसंपादित झाल्याने उत्तरवाहिनी सावित्री नदीपात्राजवळील स्मशानभूमीलगतच्या मोकळ्या जागेत डम्पिंग ग्राऊंड तयार करण्यात आले आहे.
पोलादपूर शहरातील विविध रस्त्यांवरून कचरा वाहून नेणार्या घंटागाडया स्वच्छतेची गाणी वाजवित सकाळी कचरा गोळा करून स्मशानभूमीलगतच्या डम्पिंग ग्राऊंडवर रिकाम्या केल्या जात आहेत. सरकारी नियमानुसार नदीपात्रापासून 100 मीटर्स आणि महामार्गापासून 200 मीटर्स क्षेत्रामध्ये डम्पिंग ग्राऊंड तयार करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मात्र, ग्रामपंचायत आणि आताची नगरपंचायत यांच्याकडे कोणताही पर्याय नसल्याने या मोकळया जागेतच कचरा गोळा केला जात आहे.
सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण करणार्या या डम्पिंग ग्राऊंडला पर्याय शोधण्यासाठी पोलादपूर नगरपंचायतीचे तत्कालीन नगराध्यक्ष निलेश सुतार, तत्कालीन उपनगराध्यक्ष सिध्देश शेठ आणि सत्ताधारी नगरसेवक व विषयसमिती सभापतींनी सावंतकोंड, पार्टेकोंड आणि चोळई या लगतच्या गावांतील जमीन मालकांकडे सरकारी निकषानुसार 15-20 गुंठ्यांची जमीन मिळविण्यासाठी चर्चा केली. याकामी रेडीरेकनरनुसार साधारणपणे 20-23 हजार रूपये प्रतिगुंठा जमिनीचा भाव दिल्यास जमीनमालक सौदा करण्यास तयार झाले नाहीत तर बाजारभाव आणि भूसंपादनाचा भाव या डम्पिंग ग्राऊंडच्या जमिनीसाठी देणे नगरपंचायतीला शक्य नसल्याने रायगड जिल्हाधिकारी कार्यालयानेच याकामी सहकार्य केल्यास नगरपंचायत सदर जमिनीची किंमत अदा करेल, अशी भूमिका घेतली नगरपंचायतीने त्यावेळी घेतली होती.
नदीला पूर आलेला….पाहिला की पाण्यातील जैवविविधतेला अपायाची तमा न बाळगता मानवी वस्त्यांना होऊ घातलेला आरोग्याचा धोका टाळण्यासाठी डम्पिंग ग्राऊंडवरील कचरा नदीपात्रात जेसीबीने लोटण्याचा एकमेव पर्याय अंमलात आणणारी नगरपंचायत पोलादपूर आता नदीला पूर येवो न येवो, नदीपात्रात कचरा लोटत आहे. याबाबत पोलादपूर नगरपंचायतीचे विरोधी पक्ष गटनेता नगरसेवक दिलीप भागवत यांनी प्रभारी मुख्याधिकारी यांना पत्र लिहून ओला कचरा व सुका कचरा व्यवस्थापन न करता सावित्री नदीपात्रामध्ये कचरा टाकण्याचा प्रकार न थांबल्यास 15 दिवसांत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यापूर्वी पोलादपूर नगरपंचायतीने कचरा गोळा करून सावित्री नदीपात्रात टाकण्याकामी तब्बल 79 लाखांची निविदा प्रक्रिया सुरू केली असल्याचा उहापोह शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे विधानसभा निवडणूकीच्या प्रचारसभेमध्ये करण्यात निलेश सुतार यांच्याकडून करण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीचे गटनेता दिलीप भागवत यांनी दिलेल्या पत्रानुसार नगरपंचायतीने सावित्री नदीपात्रामध्ये गाळ टाकणे थांबविले नाही तर या पक्षाकडून आंदोलनाचा पवित्रा घेतला जाण्याची चिन्हे दिसून येत आहेत. कचरा गोळा करणार्या ठेकेदाराकडून कमी कर्मचारी कामावर ठेऊन अधिक कर्मचारी संख्या ठेवल्याचा मोबदला देताना नगरपंचायतीकडून हजेरी व कामावर लक्ष ठेवले जाते अथवा कसे याबाबत प्रश्न निर्माण झाला असून विरोधी पक्षनेत्यांच्या पत्रामुळे अनेक गोष्टीत वाचा बंद होण्याची वेळ ओढवणार आहे.