। मुरुड-जंजिरा । वार्ताहर ।
दिवाळी हंगाम पर्यटनाच्या दृष्टीने चांगला गेला. समुद्रकिनारी असणार्या हॉटेल व्यावसायिकांनी चांगली सेवा देऊन पर्यटकांना खुश केल. पर्यटकांची सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे ताजी मासळी पापलेट, सुरमई, रावस, जिताडा, कोळंबीवर दिवाळीच्या सुट्टीत खूप ताव मारला व वर्षभर पुरेल एवढे ताजे कोळंबीचे सोडे मोठ्या प्रमाणात खरेदी केले.
मुरुड व राजपुरी येथील सोडे प्रसिद्ध आहेत. कोणताही वास न येणारे सोडे फक्त मुरुडला मिळतात. मुरुडचे अर्थकारण या हिवाळी हंगामावर अवलंबून राहते. याचे कारण अनेकवर्ष रखडलेला साळाव मुरुड रस्ता झाला. मुरुड समुद्रकिनारी सुशोभिकरण झाल्याने उत्तम पार्किंगची सोय झाली. हंगामात 400 पर्यटकांची वाहने समुद्रकिनारी पार्कींग झाल्याने पर्यटक पर्यटनचा खरा आनंद घेऊ शकले.
सुक्या मासळीला मागणी वाढली आहे. ऑक्टोबरच्या कडक उन्हात सुरमई, हलवा, बोंबील. अंबाडी सुकट, पांढरी सुकट कोळी महिलांनी मोठ्या प्रमाणात सुकवली आहे. पर्यटकांची चांगली साथ मिळाल्याने साठवलेला सगळा माल संपला. कोळी महिलांना मासळी सुकवण्यासाठी सुरक्षित जागा नसल्याने सुक्या मासळीचे उत्पादन बनवण्यावर बंधन आहे. कोळी महिलांची अनेक वर्षांची मागणी आहे कि, मासळी सुकवण्यासाठी समुद्रकिनारी काँक्रिटचे ग्राऊंड पाहिजे. जेणेकरून सुकलेल्या मासळीला स्वच्छ करणे सोपे जाते व मासळीचा दर्जा उत्तम होतो.
मासेमारीतून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल देखील होत असते. कोकणातून परदेश आणि परराज्यात देखील मासे पाठवले जातात. शिवाय त्यावर प्रक्रिया करणार देखील उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. परिणामी वर्षाला हजारो कोटींची उलाढाल या व्यवसायातून होते. परंतु मुरुडकडे त्यादृष्टीने पहिले जात नाही. मच्छिमारांसाठी रायगडला कोणताही चांगला प्रकल्प आला नाही. येथील मच्छिमारांचे मासेमारीत कौशल्य बघता येथील मासळीला मुरुडलाच मार्केट मिळाले तर कोळी बांधवांचा डिझेल खर्च वाचले व मासे परदेशात नेणार्या कंपन्यांमुळे येथील युवकांना रोजगार मिळेल यासाठी लकोप्रतिनिधींनी प्रयत्न करण्याची गरज आहे.