सिव्हील हॉस्पिटलमधील सिटीस्कॅन मशीनमध्ये बिघाड

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन गेल्या चार दिवसांपासून बंद आहे. या मशीनमध्ये बिघाड झाला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रुग्णांची सिटीस्कॅन करताना अडचणी निर्माण होत आहेत.

अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. गेल्या 40 वर्षापासून जिल्हा रुग्णालयाची इमारत उभी आहे. अपघातग्रस्त व इतर रुग्णांचे सिटीस्कॅन करण्यासाठी पुर्वी पनवेल व अन्य खासगी ठिकाणी जावे लागत होते. रुग्णांना आर्थिक भुर्दंड बसत होता. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात अद्ययावत अशी सिटीस्कॅन मशीन आणण्यात आली. या मशीनद्वारे अपघात रुग्णांसह इतर रुग्णांची सिटीस्कॅन करण्याचे काम केले जाते. ‌‘क्ष’ किरण विभागात ही मशीन कार्यरत आहे. दिवसाला तीसहून अधिक रुग्णांचे सिटीस्कॅन करून त्यांच्या आजाराचे निदान करण्याचे काम केले जाते. परंतु, गेल्या चार दिवसांपासून ही मशीनच बंद पडली आहे. मशीनच्या इंजिनमध्ये बिघाड झाला आहे. नवीन पार्ट बसविल्यावर हे मशीन चालू होण्याची शक्यता आहे. एका कंपनीला हे काम देण्यात आले आहे. परंतु, अजूनर्यंत दूरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असल्याचे चित्र आहे.

सिटीस्कॅन मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ही मशीन बंद आहे. दुरुस्तीचे काम एका एजन्सीला दिले आहे. मशीनमध्ये नवीन पार्ट बसविण्याचे काम केले जाणार आहे. लवकरच मशीन सुरु होईल.

डॉ. निशीकांत पाटील,
जिल्हा शल्यचिकित्सक, अलिबाग

Exit mobile version