| पनवेल | प्रतिनिधी |
नवीन पनवेल परिसरातील नागरी समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, महापालिकेचे अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक 17मध्ये मूलभूत सुविधांचा अभाव प्रकर्षाने जाणवत असून, नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रभागातील अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून, त्यांच्या दुरुस्तीची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची होत असल्याची तक्रार आहे. खड्ड्यांमध्ये केवळ खडी टाकून तात्पुरती मलमपट्टी केली जात असल्याने काही दिवसांतच ते पुन्हा उघडे पडतात. त्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. रेल्वे स्थानक आणि बसस्थानक या दोन्ही महत्त्वाच्या सुविधा या प्रभागात असल्याने वाहनांच्या पार्किंगची समस्या गंभीर बनली आहे. अनियोजित पार्किंगमुळे वाहतूक कोंडी नित्याची झाली असून, नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याशिवाय सेक्टर 13 येथील उद्यानात बेकायदेशीर मटन विक्री, रेल्वे स्थानक सेक्टर 17 परिसरातील फूटपाथवर सुरू असलेले अनधिकृत खाद्यपदार्थांचे स्टॉल, पिण्याच्या पाण्याची अपुरी व्यवस्था, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि वाढती वाहतूक कोंडी या समस्यांनी नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, या गंभीर प्रश्नांवर महापालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी महापालिकेच्या सभागृहात या प्रश्नांवर ठोस भूमिका न मांडता पक्षाची बाजू व नेत्यांचे गुणगान गात जास्त गातांना दिसत आहेत. मात्र, नागरिकांच्या मते या नागरिक मूलभूत प्रश्नांवर अपेक्षित पाठपुरावा होताना दिसत नसल्याने लोकप्रतिनिधींविषयी नाराजी वाढत आहे. आता तरी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
नवीन पनवेलमध्ये नागरी समस्या कायम
