। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असलेल्या अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयाची जीर्ण इमारतीचे पुन्हा एकदा नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करुन त्याप्रमाणे निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदिश सुखदेवे यांनी दिली. दरम्यान, रुग्णालयातील इमारतीचा स्लॅब कोसळणे, गळती लागणे अशा गोष्टींना नुकत्याच झालेल्या फायर फायटरचे काम जबाबदार असल्याचेही सुखदेवे यांनी सांगितले. तर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांनी बांधकाम विभागाच्या टोलवाटोलवीमुळे इमारतीचे दुरावस्था होत असल्याचे सांगितले.
जिल्हा रुग्णालयाची इमारत 1980 साली बांधण्यात आली आहे. या दोन मजली इमारतीत सध्या अपघात विभाग, क्ष-किरण विभाग, सोनोग्राफी, डायलेसिस विभाग, स्त्री आणि पुरष सर्जिकल वॉर्ड, शस्त्रक्रीया विभाग, अतिदक्षता विभाग, औषध भंडार, कोव्हिड वॉर्ड आणि जळीत विभाग, नवजात बालक संगोपन विभाग, तसेच टेलिमेडिसीन कक्ष कार्यान्वयित आहेत. रुग्णांची वाढती संख्या आणि विभाग लक्षात घेतले तर इमारत आता अपुरी पडायला लागली आहे. त्यामुळे या इमारतीत शेकडो जणांचा नेहमी राबता सुरू असतो.
इमारतीच्या बांधकामाला 40 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळे इमारत जीर्ण आणि धोकादायक बनत चालली आहे.
इमारतीच्या देखभाल दुरुस्तीचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गेल्या आठ वर्षात इमारतीवर तब्बल 12 कोटी रुपये येवढा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र इमारतीची परिस्थिती काही सुधारलेली नाही. अनेक ठिकाणी इमारतीला गळती लागली आहे. स्लॅब पडण्याच्या घटनाही घडल्या आहेत. काही ठिकाणी टेकू लावण्याची वेळही आली आहे. त्यामुळे ही इमारत पाडून नवीन इमारत बांधण्याची मागणी केली जात आहे. सन 2012 मध्ये या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. त्यावेळी इमारत धोकादायक झाली असून व्यापक दुरुस्तीची गरज असल्याचा अहवाल स्ट्रक्चरल ऑडिट करणार्या संस्थेने दिला होता. तर आरोग्य विभागाने जुन्या इमारतीची दुरुस्ती करण्याऐवजी नवीन इमारत बांधून द्यावी, अशी मागणी बांधकाम विभागाकडे केली होती. मात्र बांधकाम विभागाने आरोग्य विभागाच्या सुचनेकडे दुर्लक्ष करून जुन्याच इमारतीच्या दुरुस्तीवर भर दिला होता. पुन्हा नव्याने अलिकडेच या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. त्यानंतर देखील इमारतीच्या दुर्दैवाचे दशावतार थांबायला तयार नाहीत.
आज ही इमारत जीर्ण आणि धोकादायक झाली आहे. अलिबाग येथे जिल्हा रुग्णालयाच्या आंतर रुग्णालय विभागाचे बांधकाम 1980साली करण्यात आले आहे. म्हणजेच इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन 40 वर्ष झाली आहेत. इमारतीत छत कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. रोज घडत असलेल्या दुर्घटनांमुळे चर्चेत आलेल्या या रुग्णालयाच्या इमारतीचे पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात येत असल्याची माहिती कार्यकारी अभियंता जगदिश सुखदेवे यांनी दिली.
जिल्हा रुग्णालयाच्या बांधकामावेळीच बांधण्यात आलेला जिना धोकादायक म्हणून पाडण्यात आला. मात्र त्याचवेळी बांधण्यात आलेली इमारत मात्र अजूनही डागडूजी करुनच वापरत असल्याने बांधकाम विभागाच्या अधिकार्यांच्या भुमिकेबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.