उमेदवार ठरविण्यात अपयश
| पेण | विशेष प्रतिनिधी |
191 पेण विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये भाजपला पेणची जागा सुटली असल्यामुळे उमेदवार हा भाजपचाच. मात्र, वैकुंठावरील कौटुंबिक यादवी अचानक समोर आल्याने उमेदवार कोण, हा निर्णय पक्षश्रेष्ठीला घेणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी हॉटेल सौभाग्यईन येथे भाजपच्या पदाधिकार्यांची गुप्त बैठक घेऊन उमेदवार कोण, असे मतदान घ्यावे लागल्याची जोरदार चर्चा आहे.
विद्यमान आमदार रविशेठ पाटील यांना वाढत्या वयोमानानुसार पक्षश्रेष्ठी उमेदवारी देण्यास नकार देत असल्याचे समजते. परंतु, स्वतः रवीशेठ पाटील यांना पुन्हा उमेदवारी करायची आहे. तर, प्रीतम पाटील या उमेदवार असतील, असे एका जाहीर समारंभामध्ये दोन वर्षांपूर्वी दस्तुरखुद्द बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी बोलून दाखविले होते. दुसरीकडे भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील यांनाच उमेदवारी मिळावी म्हणून त्यांचे समर्थक सागर बंगल्याच्या पायर्या झिजवत आहेत, अशी चर्चा आहे. त्यामुळे वैकुंठावरील उमेदवार कोण? या गर्दीत भाजप पदाधिकारी संभ्रमात पडले आहेत. तर, तिघांमध्ये कोणाची बाजू घ्यायची, याबाबत पेणमध्ये चर्चा रंगत आहेत.
सौभाग्यईन येथे गुप्त मतदानामध्ये भाजपच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांनी वैकुंठ निवासावर नाराजी दाखवली आहे. एकंदरीत, पेण विधानसभा मतदारसंघात भाजप पक्षश्रेष्ठीला वैकुंठावरील गृहकलह सोडविण्यास अपयश येत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.