| अलिबाग | प्रतिनिधी |
केंद्रात व राज्यात गुण्या गोविंदाने संसार थाटणाऱ्या भाजप व शिंदे गट शिवसेना पक्ष अलिबाग-मुरुड विधानसभा मतदार संघात वेगवेगळे निवडणूक लढवित आहेत. भाजपचे दिलीप भोईर यांच्या पुढाकाराने या मतदारसंघात सरपंचसह सदस्य पदाचे 139 उमेदवार ग्रामपंचायत निवडणूक लढवित आहेत. त्यांच्यामध्ये काटाकाटी सुरु झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वात मोठा पक्ष अशा फुशारक्या मारणाऱ्या शिवसेनेचा शिंदे गट अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. त्याचा फटका विद्यमान आमदार दळवींना बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
रायगड जिल्ह्यात 210 ग्रामपंचायतीचे मतदान येत्या 5 नोव्हेंबरला आहे. रायगड जिल्ह्यात शेकाप व इंडिया आघाडी एकत्र निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे शेकाप, इंडिया आघाडीला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. याउलट अलिबाग व मुरुड विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) विरूध्द भाजप अशी लढत अनेक ग्रामपंचायतीमध्ये पहावयास मिळत आहे.
भाजपचे दिलीप भोईर यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंचपदाचे आठ व सदस्यपदाचे 79 उमेदवार, मुरुड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंचपदासाठी सहा व सदस्य पदाचे 50 असे एकूण 14 सरपंच व 129 सदस्य पदाचे उमेदवार उभे केले आहेत. शिंदे गटाला त्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तविली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आमदारांचे काय होणार असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे.