रसायनीत फटाके फोडण्यावरुन हाणामारी, दोघे जखमी

| रसायनी | वार्ताहर |

फटाके फोडण्यावरुन झालेल्या हाणामारीत दोघे जण जखमी झाले असून, रसायनी पोलीस ठाण्यात परस्पर विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

रसायनी पोलीस ठाणे हद्दीत नवीन पोसरी येथील सेवालाल मंदिराजवळ सोमु हेमू राठोड यांचा मुलगा महेश फटाके फोडत असताना ते इकडे तिकडे उडाल्याने त्या गोष्टीचा मनात राग धरून विशाल बाळू चव्हाण, राठोड, देवराज राठोड, वाल्या चव्हाण, भोजराज राठोड आणि तीन अल्पवयीन मुलांनी (सर्व रा. नविन पोसरी-मोहोपाडा, ता. खालापूर) गैरकायदा मंडळी जमवून सोमू याला शिविगाळी दमदाटी करुन मारहाण केली. तसेच विशाल चव्हाण याने सोमू यांच्या डोक्यात लाकडी काठी मारून दुखापत केली, तर दुसर्‍या गटाने दिलेल्या तक्रारीनुसार विशाल चव्हाण याने दिवाळी सणानिमित्त नवीन दुचाकीची पूजा करताना फटाके विशाल याच्या अंगावर आले. त्याबाबत विशालने राठोड यास फटाके लांब फोडा असे बोलले असता शाम राठोड, पवन खुभ्या चव्हाण, सोमू हेमु राठोड, विजय पुन्या राठोड, सावन उभ्या राठोड आणि पाच अल्पवयीन मुलानी गैरकायद्याची मंडळी जमवून विशाल याला शिविगाळी दमदाटी करुन मारहाण केली. दोन्ही गटाने रसायनी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दाखल केल्यानंतर जिल्हाधिकरी यांनी जारी केलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई महेश धोंडे हे करीत आहेत.

Exit mobile version