| छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी |
मंत्री अब्दुल सत्तार हे त्यांच्या वादग्रस्त विधानांनी कायम चर्चेत असतात. आताही असाच प्रकार घडला आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्ताने गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमात झालेल्या गोंधळावेळी अब्दुल सत्तार स्वत: स्टेजवर होते. त्यांनी तिथूनच माईक हातात घेत पोलिसांना लाठीमारचे आदेश दिले. यावेळी त्यांनी अपशब्द वापरले. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विरोधक करत आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड या ठिकाणी बुधवारी गौतमी पाटीलचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी काही तरुणांनी हुल्लडबाजी केली, त्यानंतर संतापलेल्या अब्दुल सत्तारांनी पोलिसांना स्टेजवरून थेट लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले. अब्दुल सत्तार यांच्या आदेशानंतर पोलिसांनी लाठीमार देखील केला. पोलिसांकडून लाठीमार होताच एकच धावपळ उडाली. दिसेल त्याला पोलिस लाठ्यांनी झोडत असल्याचे व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवरुन दिसून येते.
महायुती सरकारची हीच संस्कृती हीच भाषा. मंत्री अब्दुल सत्तारांचे आभार मानतो की त्यांनी महायुती सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणला. हजारोंच्या गर्दी सामोर पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे तोंडी आदेश देऊन लोकांना फोडून काढायची भाषा वापरतात. सांस्कृतिक, सामाजिक, प्रबोधनाच्या नावाखाली कार्यक्रम घेऊन उपस्थितांच्या आई-वडिलांवर अश्लील भाषेत टिपणी करत हजारो माता भगिनींना मान शरमेनं खाली घालायला लावणारे हे कसले मंत्री आणि हे कोणते प्रबोधनात्मक कार्यक्रम.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार
आपण ग्रामीण भाषेतल्या बोलीमध्ये बोलून गेलो, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. तिथे 65 हजार जनता होती, त्यात 20 हजार महिला व मुलं होती. त्यामुळे ते सुरक्षितपणे घरी पोहोचणे गरजेचे होते. म्हणून आक्रमकपणे हुल्लडबाजी करणाऱ्यांना ओरडलो.
मंत्री अब्दुल सत्तार







