कार्यकर्ते-पोलिसांत धुमश्चक्री; शेकापचे पदाधिकारी ताब्यात
| मुंबई | वृत्तसंस्था |
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत इंडिया आघाडीने ‘मी पण गांधी’ ही पदयात्रा आयोजित केली. परंतु, मुंबईतल्या फॅशन स्ट्रीटजवळ ही पदयात्रा पोहोचल्यानंतर तिथे पोलिसांनी पदयात्रा आडवली. त्यानंतर पोलीस आणि इंडिया आघाडीतल्या पक्षांचे कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाली. शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पदयात्रेमध्ये भाजपच्या कार्यप्रणालीविरोधात घोषणाबाजी करीत लालबावट्याची ताकद दाखवली. काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी आणि कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

मेट्रो सिनेमा येथून पदयात्रा निघून फॅशन स्ट्रीट मार्गे हुतात्मा चौक, काळा घोडा, श्यामाप्रसाद मुखर्जी चौक -बाळासाहेब ठाकरे पुतळा, लाल बहादूर शास्त्री पुतळा, रिगल सिनेमा, मादाम कामा रोड मार्ग-कूपरेज डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा, कूपरेज राजीव गांधी पुतळा, मंत्रालय समोरून महात्मा गांधी पुतळा येथे थांबणार होती. मात्र या पदयात्रेला परवानगी नसल्याने पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले. कार्यकर्त्यांना रोखल्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. संपूर्ण देशात सध्या ‘फोडा आणि राज्य करा’ हे इंग्रजांचे राजकारण भाजप करत आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात ज्या विद्वेषाच्या घटना घडत आहेत. याचा निषेध करत समाजात सद्भावनेचा विचार रूजवण्याची गरज आहे. असे सांगून पदाधिकाऱ्यांनी ‘मी पण गांधी’ चा नारा दिला.