। पालघर । प्रतिनिधी ।
राज्यात नुकत्याच बारावीच्या परीक्षा पार पडल्या. परीक्षेचे टेन्शन संपले असले तरी काही महिन्यातच लागणाऱ्या निकालाचे टेन्शन विद्यार्थ्यांना आहे. तर शिक्षकांचेही उत्तरपत्रिकांच्या तपासणीचे काम वेगाने सुरू आहे. अशातच विरारमध्ये 12 वी बोर्डाच्या तपासणीसाठी आलेल्या उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या घरी जळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
विरार पश्चिम येथील गंगुबाई अपार्टमेंटमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. 12 वीच्या कॉमर्सच्या उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या निष्काळजीपणामुळे त्यांच्याच घरी जळाल्या असल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना सोमवारी (दि. 10) घडली असून शिक्षिकेच्या मुलाची दहावीची परीक्षा असल्याने त्या आपल्या मुलाला सोडायला गेल्या होत्या. त्यावेळी देवघरात असणारा बल्ब शॉर्टसर्कीट झाल्याने त्याचा स्पार्क सोफ्यावर उडाला आणि सोफ्यासह उत्तरपत्रिकादेखील जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे.
बोर्डाच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका या शाळेतच तपासणे बंधनकारक आहे. असे असताना शिक्षिकेने उत्तरपत्रिका घरी का आणि कशा नेल्या, असा सवाल उपस्थित करत नागरिकांनी या घटनेवरुन संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच, याप्रकरणी चौकशीचे आदेश शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत.
धक्कादायक! आगीत बारावीच्या उत्तरपत्रिका जळून खाक; विद्यार्थ्यांच्या निकालावर होणार परिणाम
