| खोपोली | प्रतिनिधी |
मातृभाषा मराठीला समृद्ध आणि संपन्न वारसा आहे. प्राचीन अशी परंपरा आहे. 3 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्यामुळे भाषा विकासाला एक नवी दिशा मिळाली आहे. आपल्या अभिजात मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी सर्वांनी भाषा विकासात महत्त्वाचे योगदान द्यावे, असे प्रतिपादन खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह किशोर पाटील यांनी केले. संस्थेच्या के.एम.सी. महाविद्यालयात अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस या उपक्रमांतर्गत आयोजित ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
महाराष्ट्र शासन- मराठी भाषा विभागाच्या सूचनेनुसार महाविद्यालयात मराठी भाषा व साहित्य मंडळ, सांस्कृतिक विभाग, ग्रंथालय व आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाचे संस्कार व्हावे, या हेतूने हे ग्रंथ प्रदर्शन आयोजित केले होते. ग्रंथ प्रदर्शनात भाषा, साहित्य, कला, विज्ञान- तंत्रज्ञान, चरित्र, आत्मचरित्र, वैचारिक, इतिहास अशा विविध विषयावरील पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली होती. ज्याला विद्यार्थी, पालक, शिक्षक, वाचक यांच्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या निबंध लेखन व प्रश्नमंजुषा स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पुस्तके देऊन गौरविण्यात आले.






