मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; पोलिसांची दमछाक
| माणगाव | प्रतिनिधी |
दसऱ्याच्या सुट्टीनंतर कोकणातून परतीच्या प्रवासाला निघालेल्या हजारो पर्यटकांमुळे रविवारी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. विशेषतः महाडकडून माणगावच्या दिशेने वाहनांची लांबलचक रांगा 3 किलोमीटर पर्यंत लागल्याने प्रवाशांचे हाल झाले. दिवसभर उन्हात अडकलेल्या वाहन चालकांनी आणि प्रवाशांनी संताप व्यक्त केला. शनिवार – रविवारी सुट्टीचा शेवटचा दिवस आणि दसऱ्यानंतर कोकणवासीय तसेच पर्यटक मुंबई, पुण्याकडे परतीच्या प्रवासाला निघाल्याने महामार्गावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती. ही वाहतूक कोंडी माणगावकर नागरिक तसेच पर्यटक व कोकणवासी यांच्या चांगलीच मुळावर आली आहे. ती वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.
काही ठिकाणी सुरू असलेले रस्त्याचे काम, वळणावरील अरुंद मार्ग आणि काही वाहनांचे बिघाड यामुळे कोंडीची तीव्रता आणखीनच वाढली. माणगाव शहरा जवळील व इंदापूर परिसरातील बायपासचे कामे अपूर्ण असल्याने या शहरावर वाहतुकीचा ताण पडत आहे. त्यामुळे दिवसभर वाहनांची मोठी गर्दी झाली होती. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी माणगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी व महामार्ग वाहतूक पोलीस सकाळ पासूनच रस्त्यावर उतरले होते. वाहनांना पर्यायी मार्गाने वळवणे, मोठ्या वाहनांना थांबवणे आणि वाहतुकीचे नियमन करणे या कामात पोलीस दिवसभर गुंतले होते. मात्र, वाढत्या गर्दीमुळे त्यांची अक्षरशः दमछाक झाली.
काही ठिकाणी वाहनचालकांनी धीर सोडून दुहेरी रांगा केल्याने परिस्थिती अधिक बिकट झाली. यामुळे काही वेळा रस्ता पूर्णपणे ठप्प झाला. अखेर पोलीस आणि स्थानिक स्वयंसेवकांच्या मदतीने सायंकाळपर्यंत कोंडी हळूहळू सुरळीत झाली. दरम्यान, नागरिकांनी महामार्गावरील अपुऱ्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दरवर्षी सुट्ट्यांच्या काळात अशीच परिस्थिती निर्माण होते, तरी ही प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना होत नाही, अशी टीका प्रवाशांनी केली. महामार्गाचे काम झपाट्याने पूर्ण करून बायपास रस्ते लवकर सुरू करण्यात यावेत, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. वाहतूक कोंडीमुळे कोकणातून परतणाऱ्या हजारो वाहनांना माणगावात अनेक तासांचा अतिरिक्त प्रवास सहन करावा लागला. महामार्गावरील ही कोंडी सुट्टीच्या हंगामात प्रशासनाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.







