माथेरानमधील पांडे प्ले ग्राऊंड भागातील क्ले पेव्हर ब्लॉक सुस्थितीत

| नेरळ | प्रतिनिधी|

माथेरान शहरात पर्यावरणपूरक रस्ते बनविले जात असून, क्ले पेव्हर ब्लॉक लावून रस्ते धूळविरहित केले जात आहेत. मात्र, शहरातील अनेक रस्त्यांवरील क्ले पेव्हर नित्कृष्ट दर्जाचे निघाले असून, ते निखळून गेल्याचे आढळून येत आहेत. मात्र, शहरातील पांडे प्ले ग्राऊंड ते लेक या भागातील रस्त्यावर बसविण्यात आलेले क्ले पेव्हर दीड वर्षानंतरदेखील आहेत तसेच आहेत. दरम्यान, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या सर्व रस्त्यांचे ऑडिट करणार आहे काय, असा सवाल भाजपचे कर्जत तालुका माजी उपाध्यक्ष विलास पाटील यांनी केला आहे.

क्ले पेव्हर ब्लॉक खराब होण्याची अशी स्थिती माथेरानमधील बहुसंख्य रस्त्यांवर दिसून येत आहे. मात्र, याच काळात माथेरानमधील पांडे प्ले ग्राऊंड ते शारलोट लेक या भागातील रस्त्यात क्ले पेव्हर ब्लॉक माथेरान नगरपरिषदेकडून लावण्यात आले होते. त्यासाठी राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने निधी दिला होता आणि त्या रस्त्याचे बांधकाम तत्कालीन मुख्यधिकारी सुरेखा भणगे यांनी निविदेत नमूद केलेल्या प्रत्येक कामे संबंधित रस्त्याचे ठेकेदार यांच्याकडून करून घेतली होती. त्यावेळी रस्त्यावर लावण्यासाठी आणलेले क्ले पेव्हर एकदा पालिका मुख्याधिकारी यांनी रिजेक्टदेखील केले होते. मात्र, त्याचे फळ सध्या माथेरानमध्ये दिसून येत आहे. माथेरानमधील हा एकमेव रस्ता असून, त्या रस्त्यावरील क्ले पेव्हर ब्लॉक निखळले नाहीत किंवा ते क्ले पेव्हर ब्लॉक झिजले नाहीत. त्यामुळे या रस्त्याच्या कामाची चर्चा माथेरानमध्ये सुरू असून, शासनाच्या यंत्रणा खराब झालेल्या रस्त्यावरील क्ले पेव्हर यांचे ऑडिट करणार आहे की नाही, असा सवाल माथेरानमधील विलास पाटील यांनी केला आहे.
पांडे प्ले ग्राऊंड भागातील रस्त्यात तीव्र उतार असूनदेखील रस्त्यावरील पेव्हर खराब झाले नाहीत, त्याचा अर्थ तेथे लावण्यात आलेले क्ले पेव्हर हे चांगल्या दर्जाचे आहेत आणि त्यामुळे भविष्यात माथेरानमधील रस्त्यांवर क्ले पेव्हर लावले जाणार असतील तर पांडे प्ले ग्राउंड रस्त्यावर लावलेले क्ले पेव्हर यांची मागणी करण्यात यावी, अशी सूचनादेखील विलास पाटील यांनी केली आहे.

Exit mobile version