जलयुक्त शिवारला क्लीनचिट

जलसंधारण विभागाचा अहवाल
मुंबई | प्रतिनिधी |
महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवार अभियानातील अनियमिततेची चौकशी करण्याची घोषणा केली होती. परंतु या चौकशीत जलयुक्त शिवार अभियानाला क्लीनचिट दिली जात आहे. या अभियानामुळे पीक पेरणी क्षेत्र आणि उत्पन्नात वाढ झाली. तसेच शेतकर्‍यांच्या राहणीमानाच्या दर्जात सुधारणा झाली, असा निष्कर्ष राज्य सरकारच्या जल संधारण विभागाच्या अहवालात काढला आहे.
योजनेत अनियमितता झाल्याचा आक्षेप कॅटच्या अहवालात घेतला गेला होता. आता या योजनेतील 58 हजारापेक्षा जास्त झालेल्या कामांचा आढावा घेऊन कॅटचा अहवालात करण्यात आलेला हा आक्षेप फेटाळण्यात आला आहे. या अभियानात तांत्रिक त्रुटी होत्या. तसेच कामात अनियमितता होती, अशी ताशेरे कॅटच्या अहवालात ओढण्यात आले होते. या योजनेचं जे उद्दिष्ट होतं ते पूर्ण झालं नाही, असंही अहवालात म्हटलं होतं. मात्र, आघाडी सरकारच्या जलसंधारण विभागाने हे कॅगचे सर्व आरोप फेटाळून लावले दरम्यान, जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत केलेल्या कामांमुळे खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांसाठी सिंचनाची सुविधा निर्माण झाली. पाणी पातळी वाढली आणि कामाची पारदर्शक अंमलबजावणी झाली, असं जलसंधारण विभागाने दिलेल्या अहवालात म्हटलंय.


जलयुक्त शिवार योजनेमध्ये काही तक्रारी नक्कीच असू शकतात. मी न्यायालयात एक अहवाल दिला होता. त्यानुसारच हा अहवाल आला असावा. 600 वेगवेगळ्या तक्रारी होत्या. त्याबाबत चौकशी होईल, असे मी स्वतः म्हटलं होते. चुकीच्या गोष्टींची चौकशी व्हायला पाहिजे. त्याला माझी काहीच हरकत नाही. पण 6 लाख कामांसाठी 600 कामांची चौकशी करण्यात आली. ती झाली नसती तर बरं झालं असतं. पण, 600 कामांसाठी ती योजनाच पूर्णपणे चुकीची होती, असं म्हणणं बरोबर नाही.
देवेंद्र फडणवीस,विरोधी पक्षनेते


सत्याचाच विजय होतो – मुनगंटीवार
सत्याचाच विजय होतो, अशी प्रतिक्रिया ठाकरे सरकारने जलयुक्त शिवारला क्लीनचिट देण्यात आल्यानंतर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सत्याचाच विजय होतो अशी प्रतिक्रिया दिली आहे. एखाद्या ठिकाणी झालेल्या त्रुटीच्या आधारे संपूर्ण योजनेला नावं ठेवणं चुकीचं आहे, तेच ठाकरे सरकारने केलं. हे सरकार बदनामीचं काम खूप चांगल्या रितीने करतं, असा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला आहे.

Exit mobile version