। पनवेल । प्रतिनिधी ।
खडी भरण्यासाठी आलेल्या एका हायवा टिपर डंपर चालकाने कोणताही अंदाज न घेता गाडी रिव्हर्स घेतल्याने डंपरच्या मागच्या चाकाखाली चिरडून क्लिनरचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पनवेलमधील कुंडेवहाळ कातकरीवाडी येथे शुक्रवारी (दि. 3) पहाटेच्या सुमारास घडली. पनवेल शहर पोलिसांनी डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शंकर विठोबा इटकर (40) असे मृत क्लिनरचे नाव असून, तो तुर्भे येथील बोनसरी गावात राहत होता. तो विकास ट्रान्सपोर्ट कंपनीत क्लिनर म्हणून कार्यरत होता. शंकर इटकर हा विकास ट्रान्सपोर्ट कंपनीच्या डंपरसोबत पनवेल येथील कुंडेवहाळ कातकरीवाडी परिसरातील हवील एंटरप्रायझेस स्टोन क्रेशरच्या साईटवर खडी लोड करण्यासाठी गेला होता. खडी लोड झाल्यानंतर डंपर चालक प्रकाश बापू धोत्रे याने डंपर मागे घेण्यास सुरुवात केली. मात्र, मागे स्वतःचा क्लिनर उभा असल्याचा अंदाज न आल्याने शंकर याला डंपरची जोरदार धडक बसली. या धडकेमुळे शंकर खाली पडला आणि डंपरच्या मागील चाकाखाली चिरडला गेला. त्याला तातडीने पनवेल उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी डंपर चालक प्रकाश बापू धोत्रे याच्याविरोधात निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
डंपरखाली चिरडून क्लिनरचा मृत्यू
