वरसोलीच्या किनार्यावर स्वच्छता मोहीम
स्वच्छता ही सेवा; जि.प.तर्फे उपक्रम
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांना स्वच्छतेची शपथ देण्यासोबत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वरसोली समुद्रकिनारी शनिवारी (दि.17) स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला विद्यार्थी, नागरिक, सामाजिक संस्थांचा उत्स्पूर्त प्रतिसाद मिळाला.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर दरम्यान स्वच्छता ही सेवा अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अभियान अंतर्गत शनिवारी आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छ्ता दिनानिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी 8 वाजता वरसोली समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत जिल्हा परिषद विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, सागरी सीमा मंच, माणुसकी प्रतिष्ठान, वरसोली ग्रामपंचायत, इंडीयन एज्युकेशन सोसायटी वरसोली, रायगड जिल्हा परिषद शाळा वरसोली, रोटरी क्लब, लायन्स क्लब, लाईफ फाऊंडेशन, कारभारी क्लास, वरसोली ग्रामस्थ यांनी सक्रीय सहभाग घेतला. जमा करण्यात आलेला कचरा वरसोली ग्रामपंचायतीच्या घंटा गाडीच्या माध्यमातून डंपिंग ग्राऊंडवर टाकण्यात आला.
यावेळी महसूल विभागाचे सहसचिव अजित देशमुख, जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले, सागरी सीमा मंचचे रघुजीराजे आंग्रे, अलिबाग पंचायत समिती विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर साळावकर, वरसोली ग्रामपंचायत सरपंच प्रमिला भाटकर, माणुसकी प्रतिष्ठानचे डॉ. राजाराम हुलवान यांच्यासह विद्यार्थी ग्रामस्थ सहभागी झाले होते.