| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिकातर्फे शहरातील स्वच्छता व नागरी सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने अत्याधुनिक वाहनांचा ताफा वाढविण्यात आला आहे. ‘स्वच्छ पनवेल, सुंदर पनवेल’ या ध्येयाने 4 लिटर पिकर मशीनची खरेदी करण्यात आली आहे. या मशीनद्वारे व्हॅक्यूम प्रणालीच्या सहाय्याने कचरा थेट कंटेनरमध्ये संकलित केला जात असून अरुंद व कठीण ठिकाणीही स्वच्छता करणे सुलभ झाले आहे. या आधुनिक यंत्रसामग्रीमुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांना कोणतीही इजा होणार नाही, अशी सुरक्षित व्यवस्था देखील करण्यात आली आहे. स्वच्छता विभागातील स्वच्छता आरोग्य निरीक्षक अधिकारी व निरीक्षक कर्मचाऱ्यांनी स्वच्छता देवदूत घेऊन प्रत्यक्ष या नवीन मशीनद्वारे कचरा उचलण्यास सुरुवात केली. या उपक्रमासाठी महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांचे मार्गदर्शन लाभले असून या यंत्रसामग्रीमुळे शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक गतिमान व प्रभावी होणार आहे. तसेच, नागरिकांना स्वच्छ व निरोगी वातावरण मिळण्यास मोठी मदत होणार आहे.







