इरशाळ गडाची दुर्गप्रेमींकडून स्वच्छता

। माथेरान । वार्ताहर ।
स्वच्छतेचे महत्त्व लक्षात घेऊन गडकिल्ले, दुर्ग आणि पर्यावरण संवर्धनासाठी काम करणार्‍या वेध सह्याद्रीचे खारपाडा विभाग या संस्थेने माथेरान समोरील उंच सुळका असलेला इरशाळ गडावर पाण्याच्या आणि इतर बाटल्या, प्लास्टिक पिशव्या, कागद आणि कचरा गोळा करून सर्व परिसर स्वच्छ केला आहे.

माथेरानमधील अनेक पॉईंट वरून दिसणारा उंच सुळका जिथे अनेक गिर्यारोहक नेहमीच आकर्षित होत असतात. खालापूर तालुक्यातील इरशाळ गडावर सुटीच्या दिवशी, शनिवार-रविवारी नवी मुंबई, पनवेल आणि इतर ठिकाणांच्या परिसरातून मोठ्या संख्येने तरुण मंडळी पावसाळी भटकंतीसाठी येत असतात. येथे येणारे अनेक पर्यटक सोबत खाद्यपदार्थ, पाणी घेऊन येतात. व जाताना कचरा मात्र गडावर टाकून देतात. त्यामुळे घाणीचे साम्राज्य गडावर पसरले आहे.यासाठी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती.याशिवाय या इरशाळ गडाचे पावित्र्य राखण्यासाठी गडावर विकृत चाळे करणे, दारू, बिअर, गुटका, सिगारेट, मांसाहार पदार्थ घेऊन येऊ नये, याबाबत पर्यटकांना सूचना दिल्या. येत्या रविवारी इरशाळ गडावरील पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.या मोहिमेत तेजस शिंदे, रोहित लोते, राज साळुंखे, जयेश तलकर, प्रथमेश धवालकर, कुलदीप भालीवडे, कल्पेश कदम, तेजस कारांदे, प्रथमेश पाटील, प्रणय कळमकर, नारायण पाटील आदी सहभागी झाले होते.

Exit mobile version