शिवगर्जना ग्रुप मदतीला आला धावून
| माथेरान | वार्ताहर |
माथेरानजवळील विकट गडावर जालना येथून आलेला तरुण वाट चुकला होता. यावेळी नेरळ फणसवाडी येथील शिवगर्जना ग्रुप पुन्हा एकदा मदतीला धावला आहे. ग्रुपच्या सदस्यांकडून या तरुणाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. हा तरुण एकटाच माथेरान विकट गड येथे ट्रेकिंगसाठी आला होता. मात्र, घनदाट जंगलातून पुन्हा घरी परतत असताना हा तरुण वाट हरवून बसल्याने गडावर रात्री अडकून पडला. ही माहिती नेरळ पोलिसांना मिळताच पोलिसांनी स्थानिक फणसवाडी येथील शिवगर्जना ग्रुपला पाचारण केले.
जालना जिल्ह्यातील राहणारा तरुण नेरळ येथून माथेरानजवळील विकट गडावर जाण्यासाठी शनिवारी (दि. 9) सकाळी आला होता. गडाबाबत माहिती नसतानादेखील हा तरुण ट्रेकर्स एकटाच स्थानिक ग्रामस्थांकडून माहिती घेत गडावर पोहोचला. परंतु तो परतीच्या प्रवासात पायवाट हरवून बसला. त्यामुळे घरी जाण्यासाठी हा तरुण मार्ग शोधत असताना घनदाट जंगलात अडकून पडला. दरम्यान, तरुणाने पोलीस हेल्पलाईन नंबरवरून पोलिसांची मदत मिळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्थानिक नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे आणि त्यांचे पोलीस पथक विकट गडाच्या पायथ्याला असणार्या फणसवाडी गावात पोहोचले. स्थानिक शिवगर्जना ग्रुपमधील तरुणांच्या मदतीने नेरळ पोलिसांनी तरुणाचा शोध घेतला. हा तरुण गडाच्या किचकट वाटेवर अडकून पडल्याने त्याला वाट सापडून येत नव्हती. मात्र स्थानिक तरुणांना गडाची पूर्ण माहिती असल्याने या तरुणाला रात्री 12 वाजता सुखरूप गडाखाली आणण्यात आले. यासाठी शिवगर्जना टीमचे सुरेश निरगुडा, हेमंत निरगुडा, रवि आगिवले, आकाश निरगुडा, हरी दोरे, राम दरवडा, दिपक, या तरुणाने माणुसकी दाखवत उत्तम कामगिरी केली.